न्यूयॉर्क: बरेचदा आपण ऑनलाइन जे ऑर्डर करतो तेच आपल्यापर्यंत पोहचतं. पण ऑनलाइन ऑर्डरमध्ये फजिती सुद्धा होऊ शकते. हे प्रमाण जरी कमी असलं तरी जेव्हा ऑर्डर येते तेव्हा शंभर टक्के ती ऑर्डर व्यवस्थितच असेल याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. आता हाच किस्सा बघा, ही एक डर्टी सर्व्हिस झाली म्हणायची! एका व्यक्तीने ऑनलाइन फ्राइज आणि मिल्कशेक मागवले. फ्राइज नीट आले पण मिल्कशेकने असा काही गोंधळ घातला की तुम्ही जर हे वाचलंत तर ऑनलाइन फूड ऑर्डर करताना दहा वेळा विचार कराल. आता तुम्ही म्हणाल ऑर्डर मध्ये गडबड होऊन-होऊन कायच झालं असेल? अहो ऑर्डरमध्ये इतकी गडबड झाली की मिल्कशेकच्या बदल्यात युरीनच आली. पहिला घोट घेताच या माणसाला ब्रह्मांड आठवलं! ही घटना आहे अमेरिकेतली, वाचा सविस्तर!
फॉक्स 59 च्या बातमीनुसार अमेरिकेतील यूटामध्ये राहणाऱ्या कालेब वुड्स ने GrubHub फूड डिलीवरी वरून Chick-fil-A नावाच्या हॉटेलमधून फ्राइज आणि मिल्कशेक ऑर्डर केले. कालेब वुड्सला खूप भूक लागली होती, तो ऑर्डर येण्याची आतुरतेने वाट बघत होता. जशी ऑर्डर आली त्याने ती जराही विलंब न करता उघडली. पटापट फ्राइज खाल्ले आणि लगेचच मिल्कशेकचा एक घोट घेतला.
मंडळी, जसा कालेब वुड्सने मिल्कशेकचा पहिला घोट घेतला तसं त्याला “अबब! ब्रह्मांड आठवलं!”. कालेब वुड्सला काहीतरी खराब असल्याचं जाणवलं, त्याला ती युरीन असल्याचं कळून चुकलं होतं. त्याने डिलिव्हरी बॉयला फोन लावला आणि काय विषय आहे विचारलं? यावर डिलिव्हरी बॉयने त्याची चूक कबूल केली. त्यात खरोखरच मिल्कशेक ऐवजी युरीन होती. कामात प्रचंड व्यस्त असल्यामुळे डिलिव्हरी बॉय गाडीत डिस्पोजेबल ग्लास ठेवायचा आणि वेळ पडल्यास त्याचा वापर करायचा.
ऑर्डर डिलिव्हर करताना डिलिव्हरी बॉय कडून गडबड झाली आणि मिल्कशेक ऐवजी युरीनचा डिस्पोजेबल ग्लास डिलिव्हर झाला. कालेब वुड्सने याची तक्रार कंपनीकडे केली. कंपनीने कालेब वुड्सला रिफंड केलं. कंपनीने त्या डिलिव्हरी बॉयला नोकरीवरून काढून टाकलं पण या सगळ्या प्रकाराने कालेब वुड्स मात्र उद्धवस्त झाला असं म्हणायला हरकत नाही.