ब्रिटीशांनी जो सोन्याचा मुकूट लुटला, तोच तब्बल 150 वर्षांनंतर परत करण्यास का झाले तयार?

| Updated on: Jan 28, 2024 | 9:37 AM

ब्रिटिशांनी ज्या ज्या देशांमध्ये शासन केलं, तिथून काही ना काही मौल्यवान वस्तू लुटून आपल्या देशात परत नेल्या आहेत. यात भारताच्या कोहीनूर हिऱ्याचाही समावेश आहे. असाच एक सोन्याचा मुकूट ब्रिटिशांती तब्बल 150 वर्षांपूर्वी लुटला होता. तो आता परत करण्यास ते तयार झाले आहेत.

ब्रिटीशांनी जो सोन्याचा मुकूट लुटला, तोच तब्बल 150 वर्षांनंतर परत करण्यास का झाले तयार?
Ghana Crown
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 26 जानेवारी 2024 | ब्रिटीशांनी भारतासह इतरही अनेक देशांवर राज्य केलं. त्यावेळी त्यांनी विविध देशांतील अनेक वस्तू लुटल्या होत्या. सोनं, चांदी, हिरे, दागिनेच नव्हे तर अनेक राजांचे मुकूटसुद्धा त्यांनी चोरून नेले होते. भारताचा कोहिनूर हिरा अद्याप त्यांच्याकडेच आहे. जसजसे हे देश स्वतंत्र झाले, तसतसे ते आपली लुटलेली मालमत्ता परत करण्याची मागणी करू लागले. ब्रिटीश सरकारकडूनही काही मालमत्ता परत केली जात आहे. आता ते एक असा मुकूट परत करत आहेत, ज्याची संपूर्ण जगभरात चर्चा आहे. हा सोन्याचा मुकूट इंग्रजांनी जवळपास 150 वर्षांपूर्वी लुटला होता.

150 वर्षांपूर्वी लुटला होता मुकूट

‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, हा मुकूट 150 वर्षांपूर्वी घानाच्या असांते शाही दरबारातून लुटण्यात आला होता. हा रत्नजडीत सोन्याचा मुकूट वर्षानुवर्षे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात ठेवण्यात आला होता. तो मुकूट परत करण्याची मागणी घाना अनेक वर्षांपासून करत होता. अखेर आता हा मुकूट आणि त्यासह इतर 31 वस्तू घानाला परत देण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला आहे.

मुकूटासह इतरही सोन्याच्या वस्तू करणार परत

काही वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने त्यांच्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवलेल्या वादग्रस्त वस्तू परत करण्यावर कायमची बंदी घातली होती. तेव्हा जगभरातून त्याचा विरोध झाला होता. नंतर यातील काही वस्तू कर्ज म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. व्ही. अँड ए. म्युझियमचे संचालक ट्रिस्ट्राम हंट यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं, “दरबारचं राजचिन्ह असलेल्या सोन्याच्या वस्तू आमच्यासाठी मुकूटासमान आहे. आता ज्या वस्तू सोपवल्या जात आहेत, त्या 19 व्या शतकात इंग्रज आणि असांते यांच्यामधील युद्धांदरम्यानच्या आहेत. यामध्ये राजाची तलवार आणि राजाच्या आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या सोन्याच्या बॅचचाही समावेश आहे.”

हे सुद्धा वाचा

सरकारशी नव्हे तर राजाशी करार

ब्रिटीश सरकारने मुकूट परत करण्याचा करार घाना सरकारशी नाही तर असांतेचा राजा ओटुमफो ओसेई टूटू सेकेंडशी केला आहे. त्यांनाच असांते राजाचा उत्तराधिकारी मानलं जात आहे. ते असांतेहेन नावाने ओळखले जातात. त्यांनी गेल्या वर्षी किंग चार्ल्सच्या राज्याभिषेकलाही हजेरी लावली होती. घानामध्ये आजही राजांची प्रभावशाली भूमिका आहे. ते आजही आधुनिक लोकशाहीचा भाग आहेत. ब्रिटीशांकडून मिळणाऱ्या या मौल्यवान वस्तू असांतेहेन यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त राजधानी कुमासी इथल्या मनहिया पॅलेसच्या संग्रहालयात प्रदर्शित केल्या जातील.