चीन आपली कमी होणारी लोकसंख्या आणि वृद्धांची वाढती संख्या यामुळे त्रस्त असताना, शेजारच्या दक्षिण कोरिया देशातही अशीच समस्या सरकारला सतावत आहे. इथे एकटे राहणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एकटं राहणारे म्हणजे लग्न न करणाऱ्या लोकांची संख्या इथे झपाट्याने वाढत आहे. लग्न करत नसल्याने त्याचा परिणाम लोकसंख्येवरही होत असून दक्षिण कोरियाची लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे. ‘ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स’ने 2050 साली दक्षिण कोरियात एकट्या राहणाऱ्यांची टक्केवारी सन 2000 च्या तुलनेत दुपटीहून अधिक असेल, असा अंदाज काही दिवसांपूर्वी वर्तवला होता.
सन 2021 मध्ये, या देशात इतर कोणत्याही प्रकारच्या बहु-व्यक्ती कुटुंबांपेक्षा एकल-व्यक्तीची कुटुंबे (7.2 दशलक्ष, किंवा तीनपैकी एक) जास्त होती.
स्टॅटिस्टिक्स कोरियाच्या मते, 2000 साली एकटे राहणाऱ्यांचे प्रमाण 15.5 टक्के होते ही टक्केवारी वाढून शतकाच्या मध्यापर्यंत सुमारे ४० टक्क्यांपर्यंत जाईल.
दक्षिण कोरियाची आकडेवारी जपान किंवा जर्मनीच्या तुलनेत अजूनही बरीच कमी असली तरी दक्षिण कोरियातील एकल व्यक्तीच्या कुटुंबांची संख्या युनायटेड किंग्डमच्या तुलनेत जवळपास समान आहे, परंतु येथे ज्या प्रकारे हा आकडा वाढत आहे, त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.
या संदर्भात एका सर्वेक्षणात अनेक महत्त्वाची माहिती समोर आली. उदाहरणार्थ, अविवाहितांपैकी निम्म्या लोकांनी पैशाअभावी आणि नोकरीच्या सुरक्षिततेच्या अभावामुळे लग्न केले नाही असे सांगितले.
12 टक्के लोकांनी मुलांच्या संगोपनात ओझे जाणवते, असे सांगितले. आपल्याला योग्य मॅच मिळालेली नाही किंवा लग्न करण्याची घाई नाही, असा दावा 25 टक्के लोकांनी केला आहे.