एका आई आणि मुलीची हृदय स्पर्शी गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पतीच्या निधनानंतर एक महिला बराच काळ एकटीच राहत होती. पण तिची मुलगी या महिलेला दुसऱ्या लग्नासाठी प्रवृत्त करत राहिली आणि आता वयाच्या 50 व्या वर्षी तिने आपल्या आईचं दुसरं लग्न लावून देण्यात यश मिळवलंय. आता ही आई आणि मुलगी प्रचंड व्हायरल होतायत, आईने खुश राहावं आणि ५० व्या वर्षी पुन्हा नवी सुरुवात करावी अशी तिच्या मुलीची नेहमीच इच्छा होती. अखेर तिची ही इच्छा पूर्ण झालीये. आता माझी आई खूप खुश आहे आणि खूप मजा करते असंही ही मुलगी बोलून दाखवते.
ही कथा देबार्ती चक्रवर्ती आणि तिची आई मौसमी चक्रवर्ती यांची आहे. या दोघी मूळच्या मेघालयची राजधानी शिलाँगच्या आहेत.
देबार्ती सांगते की, तिचे वडील शिलाँगचे प्रसिद्ध डॉक्टर होते. ती लहान असतानाच ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचा अचानक मृत्यू झाला. तेव्हा तिची आई 25 वर्षांची होती आणि ती स्वतः 2 वर्षांची होती.
वडिलांच्या निधनानंतर देबार्ती आणि त्याची आई शिलाँगमधील आजीच्या घरी राहू लागले. तिची आई शिक्षिका होती. ‘त्याने जोडीदार शोधावा, अशी देबार्तीची नेहमीच इच्छा होती. पण ती म्हणायची- माझं लग्न झालं तर तुझं काय होईल?’ असं देबार्ती म्हणते.
देबार्तीने सांगितले की, वडिलांच्या निधनानंतर काकांशी घरातील संपत्तीवरून वाद झाला. अगदी कायदेशीर लढाईही सुरू झाली. या सगळ्या गोष्टींमध्ये ती अडकली होती.
देबार्ती आता मुंबईत राहते. ती फ्रीलान्स टॅलेंट मॅनेजर म्हणून काम करते. आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना देबार्ती म्हणाली, “आईला लग्न करायला खूप वेळ लागला. मी आधी तिला कोणाशी तरी मैत्री करायला सांगितली. मी सुरुवातीला फक्त एवढंच बोलले होते की बोल, मित्र बनव. असं करत करत मी तिला लग्नासाठी मनवलं”
याच वर्षी मार्च महिन्यात देबार्तीच्या आईचं पश्चिम बंगालच्या स्वपनशी लग्न झालं. या दोघांचे वय 50 वर्षे आहे. स्वपनचं हे पहिलं लग्न असल्याचं देबार्ती सांगतात.
लग्नानंतर आईचं आयुष्य खूप बदललं आहे, असं तिने सांगितलं. ती आता खूप आनंदात आहे. सुरुवातीला ती प्रत्येक गोष्टीवरून चिडायची. पण आता तिला खूप मजा येते, ती खूप खुश आहे.