कलाकार हा नेहमी कलाकारच राहतो! त्याच्या कुठल्याही कामात कलाकारी दिसतेच. कलेने जगणं सोपं होतं असं लोक म्हणतात. कला ही अशी गोष्ट आहे जी सुख देते. कलाकार वेगवेगळ्या व्यासपीठावर आपली कला सादर करताना एक वेगळी छाप सोडतात. जे पाहिल्यानंतर सामान्य माणूस स्तब्ध होतो. असेच काहीसे गोव्यातही पाहायला मिळत आहे, जिथे कलाकारांनी आपल्या कलेचा असा काही उपयोग केलाय की त्याचं जोरदार कौतुक होतंय.
विकासाच्या रथावर स्वार झालेल्या शहरी जनतेला आपल्या आरोग्याची काळजी घेता येत नाही, हे आपल्या सर्वांनाच माहितीये.
देशातील अनेक राज्यांची सरकारे उद्यानांमध्ये ओपन जिम सेवा पुरवत आहेत. पण लोक त्या उद्यानात येण्याचं नाव घेत नाहीत. ही योजना सरकारने केली खरं पण लोक क्वचितच इथे येऊन व्यायाम करताना दिसतात.
मग लोकांना आकर्षित कारण्यासाठी काय करता येईल? गोव्याच्या एका कलाकाराने यावर एक उत्तम आयडिया केली. त्याने असं काही डोकं लावलं की येणार जाणारा या जिमचा वापर नक्की करेल.
या कलाकारानं आऊटडोअर जिमला एखाद्या फिल्मच्या सेट असल्या सारखं रुपांतरित केलं जिथे व्यायाम करायला येणारे लोक रामायणातील वेगवेगळ्या प्रकारचे अवतार बघू शकतात आणि तिथे येऊन व्यायाम करू शकतात.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पार्कमध्ये लोक पौराणिक पात्रांसोबत व्यायाम करताना दिसत आहेत.
हे उद्यान आकर्षक दिसत असून लोकांना जिमकडे आकर्षित करत आहे. दीप्तेझ वेर्णेकर असे ही कला तयार करणाऱ्या कलाकाराचे नाव आहे.
या कलेत तंत्रज्ञानालाही तितकंच महत्त्व आहे. लोक मैदानी जिममध्ये रावणासारख्या पौराणिक पात्रांसह व्यायाम करू शकतात. हा व्हिडिओही वेर्णेकर यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
वेर्णेकर म्हणाले, ‘शहरी यंत्रणा आणि स्थानिक तंत्रज्ञान यांची सांगड घालता यावी, यासाठी मी ओपन जिम क्रिएटिव्ह केली. ही पद्धत लोकांना फिटनेसकडे आकर्षित करेल.”