मुंबई: भारतीय समाजात घटस्फोट अजूनही पूर्णपणे स्वीकारलेला नाही. जे पती-पत्नी आपले नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतात ते बर्याचदा सार्वजनिकरित्या या विषयावर बोलणे टाळतात. स्त्रियांसाठी गोष्टी अधिक कठीण असतात कारण अनेकदा त्यांना लग्न संपुष्टात आणण्यासाठी दोषी ठरवले जाते. अशातच घटस्फोटाचा आनंद साजरा करणारी एक महिला सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलीये. कलाकार आणि फॅशन डिझायनर शालिनीने घटस्फोटानंतर एक फोटोशूट केले आहे, तेही अशा काळात जेव्हा लोक प्री-वेडिंग आणि वेडिंग शूटवर खूप पैसे खर्च करतात, शालिनीने मात्र या घटस्फोटाच्या फोटोशूटवर आपले पैसे खर्च केलेत. फोटोशूट शेअर करत इन्स्टाग्रामवर लिहिले की, ‘A Divorced woman’s Message to those who feel voiceless’. एका घटस्फोटीत महिलेचा अशा महिलांना संदेश ज्या व्यक्त होऊ शकत नाहीत, त्यावर बोलू शकत नाहीत असा या कॅप्शनचा अर्थ.
“वाईट लग्न सोडायला हरकत नाही कारण तुम्ही आनंदी राहण्यास पात्र आहात आणि कधीही तडजोड करू नका, आपल्या आयुष्याचा ताबा घ्या. स्वत: साठी आणि आपल्या मुलांसाठी चांगले भविष्य तयार करण्यासाठी आवश्यक बदल करा. घटस्फोट हे अपयश नाही! आपल्यासाठी आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा टर्निंग पॉईंट आहे. एकटे उभे राहण्यासाठी खूप हिंमत लागते, म्हणून मी हे सर्व शूर महिलांना समर्पित करते.” असं तिने पुढे लिहिलंय.
शालिनीच्या फोटोशूटवर लोकांची मतं विभागली गेली होती. अनेकांनी याला प्रेरणादायी संकल्पना म्हटले आणि ती आवडली. शालिनीच्या या धाडसाबद्दल अनेकांनी तिचे अभिनंदन केले. मात्र त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची संख्या चांगलीच होती.
घटस्फोटाचा आनंद साजरा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपूर्वी अमेरिकेत एका महिलेने आपला लग्नाचा ड्रेस जाळून आपला घटस्फोट साजरा केला आणि फोटोशूट केले.