मुंबई : शिक्षण, नोकरी अन् त्यानंतर लग्नासाठी योग्य साथीदार सध्या या तरूणांसमोरच्या गंभीर समस्या आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनासारखी नोकरी मिळणं तसं कठीण झालंय. अश्यात नोकरी मिळाली तरी योग्य जीवनसाथी मिळत नाही. पण या सगळ्या समस्यांवर एका कंपनीने (Company) उपाय काढलाय. यामुळे तुमच्या सगळ्या समस्या दूर होती. ही कंपनी तुम्हाला चांगली नोकरी देते. शिवाय जीवनसाथी (Spouse) शोधून देण्यास मदत करते. लग्न झाल्यानंतर पगारवाढही देते. त्यामुळे या कंपनीत नोकरी करणं सिंगल मुलांचं स्वप्न झालंय.
एका मीडिया रिपोर्टनुसार, ग्लोबल टेक्नोलॉजी सॉल्यूशन प्रोवायडर कंपनी श्री मुकाम्बिका इंफोसोल्यूशन्स आपल्या अविवाहित कर्मचाऱ्यांना जीवनसाथी शोधण्यासाठी मदत करते. तामिळनाडूच्या मदुराईतील शाखेत या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 2006 मध्ये ही कंपनी शिवकाशी इथं सुरू झाली. यानंतर 2010 मध्ये या कंपनीने मदुराईमध्ये आपली नवी शाखा सुरू केली. या कंपनीची वार्षिक कमाई 100 कोटींच्या घरात आहे.
“सुरुवातीला आम्हाला कंपनीसाठी कर्मचारी नेमण्यात अडचणी आल्या. त्यानंतर आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा देण्याबाबत विचार केला. तश्या काही खास सुविधाही आम्ही सुरू केल्या. यामुळे कंपनीला चांगले कामगार मिळाले. शिवाय कंपनीची कामगिरीही सुधारली. आमचं आणि कर्मचाऱ्यांचं नातं एखाद्या कुटुंबासारखं आहे. कंपनीतील कर्मचारी मला मोठा भाऊ मानतात”, असं या कंपनीचे सीईओ सेल्वागणेश यांनी म्हटलंय.
“आमच्या कंपनीत काम करणारे अनेक लोक दूरच्या गावातून येतात. त्याचे आई-वडील गावात राहत असल्याने त्यांना लग्नासाठी जोडीदार शोधण्यात अडचणी येतात. त्यामुळे आम्ही अलायन्स मेकर्सद्वारे या कर्मचाऱ्यांसाठी वधू-वर शोधण्यात मदत करतो. या लग्नात कंपनीतील सर्व कर्मचारी जातात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लग्न होताच त्या कर्मचाऱ्याचा पगारदेखील वाढवला जातो”, सेल्वागणेश यांनी सांगितलं आहे.