Dolly Ki Tapri Maldives: नागपूरकर असलेला डॉली चहावाला देशभर प्रसिद्ध झाला आहे. परंतु त्याच्या टपरीवर काही महिन्यांपूर्वी अब्जाधीश व्यक्ती अन् मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेट्स आले. त्यांनी त्याने बनवलेल्या चहाचा स्वाद घेतला. त्यांचा सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्यासोबतची पोस्ट टाकली. त्यानंतर डॉली जगभर प्रसिद्ध झाला. सोशल मीडियावर त्याचे युजर्स लाखोच्या संख्येने झाले. आता डॉलीने 16 जून रोजी त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यानंतर त्याची चहा जगभरात प्रसिद्ध झाल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. डॉली चहावाल्याने चक्क मालदीवमधील समुद्र किनारी टपरी लावल्याचा हा व्हिडिओ आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये डॉली चहावाला मालदीवमधील समुद्र किनारी चहा बनवताना दिसत आहे. त्यानंतर विदेशी पर्यटकांना तो चहा देताना दिसत आहे. काही जण कौतुकाने हा काय करत आहे, ते पाहत आहेत. त्यानंतर काही जण त्याच्यासोबत फोटोही घेताना दिसत आहेत. डॉलीचा मालदीवमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
डॉलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ १६ जून रोजी टाकला आहे. त्याचे इंस्टाग्राम हँडल @dolly_ki_tapri_nagpur या अकाउंटवर मालदीव वाइब्स कॅप्शन देऊन त्याने हा व्हिडिओ टाकला आहे. एका दिवसातच हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. २ लाख ६७ हजार लोकांनी १७ जूनपर्यंत त्याला लाइक केले आहे. त्याच्यावर हजारो जणांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी डॉलीच्या दुबई दौऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता. आता मालदीव दौऱ्याचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
डॉली हा महाराष्ट्रातील नागपुरातील आहे. त्याच्या चहा बनवण्याच्या स्टाईलमुळे तो प्रसिद्ध झाला आहे. अनेक दिग्गजांनी त्याने बनवलेल्या चहाचा स्वाद घेतला आहे. नागपुरात त्याची चहाची दुकान ‘डॉलीची टपरी’ नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्या टपरीवर ब्लॉगर, इंफ्यूलेंसर आणि सामान्य लोक येतात. त्याच्यासोबत सेल्फी घेतात. व्हिडिओ काढतात. डॉली याना दक्षिण भारतीय चित्रपट आवडतात.