सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी एका फूड ब्लॉगरने ‘डिझेल पराठा’चा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. परंतु त्यानंतर जे घडले त्यामुळे त्या फूड ब्लॉगरला माफी मागावी लागली. हॉटेलच्या मालकास स्पष्टीकरण द्यावे लागले. हा व्हायरल व्हिडिओ चंदीगडमधील एका रस्त्यावरील हॉटेलचा होता.
फूड ब्लॉगर अमनप्रीत सिंग एका दिवशी जेवणासाठी चंदीगडमध्ये पोहचले. त्या ठिकाणी पराठा बनवणाऱ्या व्यक्तीला पाहून ते थांबले आणि त्यांनी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. व्हिडिओ शूट झाला परंतु त्याला सोशल मीडिवर व्हायरल करण्यासाठी ‘डिझेल पराठा’ नाव दिले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर मात्र फूड ब्लॉगरच्या अडचणी सुरु झाल्या.
व्हिडिओमध्ये फूड ब्लॉगर अमनप्रीत सिंग यांनी पराठा डिझेलमध्ये भाजला जात असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्यासंदर्भात चिंता निर्माण झाली. त्या व्हिडिओत हॉटेल मालक डिझेल पराठा बनवत असल्याचे म्हणताना दिसत होतो. हा व्हिडिओ व्हायरल होताच गदारोळ माजला. सोशल मीडिया युजर्सकडून आरोग्यसंदर्भात चिंता व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया आल्या. डिझेलचे सेवन आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे म्हटले गेले. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी झाली.
सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे कायदेशीर कारवाई होण्याचा धोका फूड ब्लॉगर अमनप्रीत सिंग यांच्यापुढे होतो. त्यामुळे त्यांनी व्हिडिओ डिलिट केला. तसेच दुसरा व्हिडिओ टाकून लोकांची माफी मागितली. हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी टाकला गेला होतो. हॉटेलमध्ये डिझेलचा वापर केला जात नव्हता. हॉटेलच्या मालकाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. आम्ही केवळ खाद्य तेलाचा वापर करतो आणि ग्राहकांना चांगल्या दर्जाचे जेवण देतो, असे हॉटेलचा मालक म्हणताना व्हिडिओ दिसतो. या व्हिडिओनंतर युजर्सकडून अनेक कॉमेंट करण्यात आल्या.