लखनौ : आई-वडील वृद्ध झाले की त्यांची काळजी तसेच सांभाळ करण्यासाठी पुढे येण्याचं धाडस मोजकीच मुलं करतात. आई-वडिलांचा म्हातारपणी सांभाळ करायचा म्हटलं की खर्च वाढणार, त्यांच्यावर केले जाणारे वैद्यकीय उपचार असा मोठा पसारा असल्यामुळे अनेक मुलं नाक मुरडतात. सध्या मात्र एक वेगळाच किस्सा समोर आला आहे. आपल्या आईचा सांभाळ करण्यासाठी चार भावांमध्ये चक्क भांडण लागले आहे. विशेष म्हणजे हे भांडण थेट न्यायालयार्यंत गेलं आहे. हा प्रकार मध्यप्रदेशमधील देवास येथील असून आईची काळजी घेण्यासाठी चारही मुलं उत्सुक आहेत. या आईचं नाव सरजूबाई असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशमधील देवास येथे विक्रम सिंह, कंचन सिंह, परमानंद तसेच प्रल्हाद असे चार भाऊ राहतात. यातील प्रल्हाद हा सर्वात छोटा भाऊ असून तो या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सीआयएसएफमधून निवृत्त झाला आहे. निवृत्त झाल्यानंतर तो आपल्या आईला भेटायला गेला. मात्र त्याचा भाऊ परमानंद यांनी त्याला आईला भेटू दिले नाही. त्यानंतर आईला भेटण्याची इच्छा असल्यामुळे प्रल्हाद यांनी 2 सप्टेंबर रोजी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी माझ्या आईला माझ्याकडे राहू दिले जावे अशी विनंती केली.
प्रल्हाद यांनी तक्रार दिल्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वृद्ध आईचा जबाब नोंबदवण्यासाठी तिला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी जबाबात मला माझ्या छोट्या मुलाकडेच राहायचे आहे, असे आईने सांगितले. आईच्या या जबाबानंतर आई छोटा मुलगा प्रल्हाद याच्याकडेच राहील असा आदेश दंडाधिकाऱ्यांनी दिला. तसेच आपल्या आदेशात आई तिच्या इच्छेनुसार कोणासोबतही राहू शकते, असेही दंडाधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र, या निर्णयाला आक्षेप घेत माझा धाकटा भाऊ आईची नीट काळजी घेणार नाही म्हणत भावांमध्ये वाद वाढतच गेला. विक्रम, कंचन तसेच परमानंद या तिन्ही भावांनी प्रल्हादसोबत वाद घातला. त्यानंतर पोलिसांचीही मदत घेण्यात आली. हा सर्व वाद थेट कोर्टाबाहेरच झाला. या प्रकरणी विक्रम, कंचन आणि परमानंद या तिन्ही भावांविरोधात प्रल्हाद यांनी पोलिसात पुन्हा तक्रर केली आहे. तक्रारीत मला तसेच माझ्या पत्नीला माझ्या भावांनी मारलं आहे, असं प्रल्हाद यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय, पोलिसांनी या प्रकरणी वेगळा गुन्हा दाखल केलाय.
दरम्यान, या प्रकरणात एक रंजक माहितीदेखील समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरजूबाई यांच्या नावावर काही जामीन आहे. सरजबाईंचा जो सांभाळ करेल त्यालाच ही जमीन मिळणार आहे. याच कारणामुळे जमिनीचा मालकीहक्क मिळावा म्हणून चारही भाऊ त्यांची आई म्हणजेच सरजूबाई यांना सांभाळण्यासाठी भांडत आहेत. सध्या हा किस्सा चर्चेचा विषय ठरला आहे.
इतर बातम्या :
Video: लग्नाआधी मिशीला ताव, बायको समोर येताच नवऱ्याचं झालं मांजर, लग्नसोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल