समलैंगिक जोडप्याच्या लग्नाची (Gay Wedding) बातमी तेलंगणातून (Telanana) समोर आली आहे. भलेही हे लग्न कायदेशीर नसलं, तरिही ‘आम्ही आता ऑफिशलीअली एकमेकांचे झालो’, अशी घोषणा करत भारतातील एका समलैंगिक जोडप्यानं जंगी पार्टी दिली आहे. या पार्टीचं त्यांच्या मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली. महत्त्वाचे म्हणजे त्यांचे कुटुंबीयही (Family) या सोहळ्यात सहभागी होते. त्यांच्या संमतीनच हा शाही सोहळा पार पडला, ही सुंदर गोष्ट अधोरेखित करायलाच हवी! इतर लग्न (Marriage) सोहळ्यांसारखाच हा सोहळाही उत्साहात पार पडला. प्रेमाची (Love Story) ही गोष्ट स्वीकारण्यासाठी, मोठं मन लागतं. स्वीकार करण्याची वृत्ती लागते. चांगल्या आणि स्पष्ट विचारांची माणसं लागतात. हे सगळं असणाऱ्या मंडळींनी अभय (Abhay) आणि सुप्रियो (Supriyo) या समलैंगिक जोडप्याच्या लग्नात धम्माल केली.
याआधी भारतात समलैंगिक जोडप्यांचं लग्न झालंय का? आम्ही गुगल गुरुला विचारलं. पण गुगलाही याबाबत काहीच माहीत नाही, हे ऐकून आम्हाला थोडासा आश्चर्याचा धक्का बसलाय. भारतीय समलैंगिक जोडप्यांनी लग्न केली आहे. पण ती भारतात केल्याचं अजूनतरी आम्हाला दिसलं नाही. आता लपून-छपून केलं असेल, तर आम्हाला कसं कळणार? पण प्रेम लपून ठेवायची गोष्ट थोडीच आहे? प्रेम तर सुंदर गोष्ट आहे. ती खुलेआम केली पाहिजे. हे अभय आणि सुप्रियोलाही माहीत होतंच. त्यामुळेच त्यांनी आपला जंगी विवाहसोहळा केला. त्यामुळे अधिकृतपणे एकमेकांचे झालेल्या अभय आणि सुप्रियोंचा हा तेलंगणात झालेला विवाह… बहुदा देशातील पहिलाच समलैंगिक विवाह असू शकतो. तो असेलच असा काही आमचा दावा नाही.. पण काही चांगल्या गोष्ट पहिल्या घडत असत, तर त्याचं कौतुक करायला हरकत काय?
मन मोठं असेल, तर छोटे विचार डोक्यात येत नाही, असं थोर लोकं सांगून गेली. प्रेम ही थोरच गोष्ट आहे. प्रेम कुणावरही होऊ शकतं. कुठंही होऊ शकतं. कसंही होऊ शकतं. प्रेमाला एका ठराविक चौकटीत बसवता येऊ शकत नाही. प्रेम ही अमर्याद गोष्ट आहे. विलक्षण सुंदर गोष्ट आहे. अशाच प्रेमात अभय आणि सुप्रियो गेल्या काही वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. एकमेकांवर मनापासून प्रेम करत आहेत. त्यांनी एकमेकांचा स्वीकार केलाय. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, समाज आपला स्वीकार करेला का?, या सगळ्याच्या आता ते दोघंही पलिकडे गेलेत.
दोघा प्रेम करणाऱ्या माणसांना स्वीकारण्याचे संस्कार आपल्या संस्कृतीनं आपल्या केले आहेत की नाही, या प्रश्न प्रत्येकानं यानिमित्तानं आपल्या मनाला विचारावा. आठ वर्षांपूर्वी एका डेटिंग ऍपद्वारनं एकमेकांची ओळख होऊन अभय आणि सुप्रियोची मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबतच घालवण्याचा निर्णय एक पार्टी देऊन जगजाहीर केलाय. अभय आणि सुप्रियोसाठी ही पार्टी म्हणजे लग्नसोहळाय!
सुप्रियो हैदराबादच्या एका हॉटेल मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये लेक्चरर आहे. तर अभय एका सॉफ्टवेअर कंपनीत डेव्हलपर आहे. दोघंही चांगलं कमावतात. समाज काय म्हणेल म्हणून त्यांनी स्वतःची फसवणूक केली नाही. प्रेम करण्यासाठी धाडस लागतं. ते त्यांनी दाखवलं. आपलं प्रेम स्वीकारलं जावं, यासाठी आपल्या कुटुंबीयांनाही त्यांना विश्वासात घेतलं. विरोध स्वाभाविक होता. पण विरोधाचा सामना करत अखेर कुटुंबीयांना विश्वासात घेतल्यानंतर अभय आणि सुप्रियो यांचा थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. तेलंगणातील विक्रमाबाद हायवेच्या ट्रान्स ग्रीनफिल्ड रिसॉर्टमध्ये या विवाहाच्या निमित्तानं अभय आणि सुप्रियोच्या मित्रमैत्रिणींना आनंदसोहळा अनुभवला. रंग, रुप यासोबतच लिंग फार महत्त्वाचं नाहीये! प्रेम या सगळ्याच्या पलिकडची गोष्ट आहे, हे अभय डांगे आणि सुप्रियो चक्रबोर्ती यांनी जगाला दाखवून दिलंय.
भारतात अजूनतरी समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यात आलेली नाही. याप्रकणी न्यायालयीन लढा अजूनही सुरु आहे. मात्र समलैंगिक संबंध ठेवणं हा कायद्यानं गुन्हा नसेल, असा निर्वाळा 2018 साली सुप्रीम कोर्टानं दिला होता. त्यामुळे दोन व्यक्ती एकमेकांशी समलैंगिक संबंध ठेवू शकतात. पण एकमेकांशी अधिकृतपणे लग्न करु शकत नाही. सध्या अस्तित्त्वात असलेल्या विवाहासंबंधिच्या कायद्यांसोबत समलैंगिक विवाहाला मान्यता दिली जाऊ शकत नाही, असा युक्तीवाद केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात केला होता.
दिल्ली हायकोर्टात एका याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेतून समलैंगिक विवाहांना मान्यता दिली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही याचिका न्यायप्रविष्ट असून त्यावर लवकरच निर्णय होणं अपेक्षित आहे. मात्र तूर्तासतरी भारतात समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही.