मुंबई: आमच्या काळात अस्सं होतं… आमच्या काळात तस्सं होतं… आमच्या काळात काही आण्यात घरातील महिन्याच्या खर्चाचं सामान यायचं… आताचा काळचं बदलला. साधे मासे आणायचे म्हटलं तर पाचशेची नोट जाते… असं आपण नेहमीच ऐकतो… आपल्या घरातील बुजुर्ग मंडळी नेहमीच हे सांगत असतात. ते म्हणतात ते तथ्यही आहे. कारण पूर्वीचा काळ स्वस्ताईचा होता, त्यामुळे भाजीपालाच काय सोनंही अगदी स्वस्तात मिळायचं. आज एका चॉकलेटची जी किंमत आहे. त्या किंमतीत पूर्वी एक तोळा सोनं यायचं. पण हो, त्यावेळी ती किंमतही खूपच होती.
एवढं सर्व सांगायचं कारण काय? तर सध्या एक बिल सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतंय. या बिलावर एक तोळा सोन्याची जी किंमत दिली आहे, ती पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. आज आपण एका चॉकलेटसाठी जेवढे पैसे मोजतो, तेवढ्या पैशात पूर्वीच्या काळी एक तोळे सोनं यायचं. पूर्वीचा काळ म्हणजे खूप खूप पूर्वी नाही… तर अवघ्यासाठ वर्षापूर्वीचं हे बिल आहे.
सोशल मीडियात व्हायरल होणारं बिल 60 वर्षापूर्वीचं आहे. 1959 मधील हे बिल आहे. महाराष्ट्रातीलच वामन निंबाजी अष्टेकर ज्वेलरी शॉपचं हे बिल आहे. या बिलामध्ये एक तोळे सोन्याची किंमत अवघे 113 रुपये दाखवली आहे.
एवढ्या पैशात आज एक चॉकलेट येतं. आज 10 ग्राम सोन्याची जी किमत आहे, त्या किंमतीत 60 वर्षापूर्वी 100 ग्रॅम सोनं खरेदी केलं असतं तरी महाग ठरलं नसतं. या बिलात सोन्याबरोबर चांदीची किंमतही देण्यात आली आहे.
3 मार्च 1959मधील हे बिल आहे. शिवलिंग आत्माराम नावाच्या व्यक्तीच्या नावावर हे बिल आहे. त्यांनी 60 वर्षांपूर्वी अवघ्या 113 रुपयात एक तोळं सोनं खरेदी केलं होतं. सोबतच चांदीही खरेदी केली होती. सोनं आणि चांदी मिळून त्याची किंमत 909 रुपये झाली होती. एवढ्या पैशात आज सोनं खरेदी करणं म्हणजे कल्पनेच्या पलीकडचे आहे.
मात्र, हे बिल पाहिल्यानंतर पूर्वीचा काळ खरोखरच सुवर्ण काळ होता असं म्हटल्याशिवाय राहवत नाही. कहाँ गये वो दिन… असे शब्दही आपोआप तोंडून निघतात. कारण आजच्या काळात सोनं खरेदी करणं ही मोठी गोष्ट आहे. कारण सोन्याचे भाव खिशाला परवडणारे नाहीत. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार लवकरच सोने 60 हजाराच्या पार जाणार आहे.