पाकिस्तानातील एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ पाहिला की तुम्ही म्हणाल हा दिवाळीचा व्हिडिओ म्हणजे भारतामधलाच आहे. पण, हा व्हिडिओ पाकिस्तानच्या कराचीतला आहे. यातील दिव्यांची भव्यता आणि आनंदाचे क्षण पाहून तुम्हालाही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावा वाटेल.
पाकिस्तानी कंटेंट क्रिएटर बिलाल हसन यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपला दिवाळीचा अनुभव शेअर केला असून दिवाळी साजरी करणाऱ्या लोकांनी भरलेल्या स्वामी नारायण मंदिराचे वातावरण दाखवले आहे. या व्हिडिओमध्ये मंदिराची चमक, फटाक्यांची आतषबाजी आणि तिथे उपस्थित कुटुंब आणि मित्र परिवाराच्या आनंदाचे सुंदर दृश्य पाहायला मिळत आहे. कंटेंट क्रिएटर बिलाल हसन यांनी दिवाळीच्या सणाशी निगडित एका विशिष्ट परंपरेची आठवण करून दिली, ज्यात त्यांनी आपल्या मित्रांना पैशांचे लिफाफे भेट दिले आणि त्यांच्या मित्रांनी मिठाई देऊन त्यांना प्रतिसाद दिला.
या व्हिडिओला आतापर्यंत 21 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर हजारो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं की, ‘वेगवेगळ्या संस्कृती एकत्र सण साजरा करताना पाहून मन प्रसन्न होतं.’ आणखी एकाने म्हटले की, ‘दिवाळी सर्वत्र साजरी केली जाते, ती खरोखरच लोकांना एकत्र आणते.’ कुणीतरी लिहिलं की, ‘कराचीमध्ये दिवाळीचा असा उत्सव बघून छान वाटलं.’
तर एका युजरने या रंगीबेरंगी सणाबद्दल आनंद व्यक्त करत लिहिलं की, ‘सण कोणत्याही धर्माचा विचार न करता प्रत्येकाने साजरे केले पाहिजेत.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘या व्हिडिओने माझा दिवस बनवला. हे आपल्या सामायिक माणुसकीचे सुंदर प्रतिनिधित्व आहे.’ बिलालचे आभार मानत एका व्यक्तीने लिहिले, ‘हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद, पाकिस्तानात दिवाळीचा आनंद पाहणे अविश्वसनीय आहे.’
या वर्षाच्या सुरुवातीला कराचीमध्ये नवरात्रीचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. यामध्ये इन्फ्लुएंसर धीरेज मानधन यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. यात कराचीतील एक रस्ता उजळून निघाला होता, जिथे देवी दुर्गा मातेची भव्य मूर्ती होती आणि महिला आणि मुले गरबा आणि दांडिया खेळताना दिसत होती. पाकिस्तानी कंटेंट क्रिएटर बिलाल हसन यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्याने तो खूप व्हायरल होत असून मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय.