नवी दिल्ली : आपला भारत देश अनेक रितीरिवाज, परंपरा आणि श्रद्धा तसेच अंधश्रद्धांनी नटलेला आहे. देशातील अनेक भागात होळी साजरी करण्याचे प्रकारही वेगवेगळे आहे. एवढंच काय तर मथुरेपेक्षा वृदांवनातील होळी साजरी करण्याची परंपरा निराळी आहे. राजस्थानच्या बासवाडामध्ये तर दोन मुलांचे परस्परांशी लग्न लावले जात असते. आणि संपूर्ण गाव या अनोख्या लग्न सोहळ्यात सामिल होत आनंद लुटत असते. कसा असतो हा सोहळा…
देशातील प्रत्येक प्रांतात होळी वेळेवर साजरी केली जात असते. तर काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीने अजूनही होळी साजरी केली जात असते. राजस्थानातील बडोदिया गावात दोन मुलांचे लग्न परस्परांशी लावण्याची आगळी प्रथा दरवर्षी पाळली जाते. होळीच्या पूर्वसंध्येला बडोदिया गावातील रहिवासी आपल्या पूर्वजांनी सुरू केलेली ही परंपरा अजूनही साजरी करीत असतात. यात नवरा आणि नवरी दोन्हीही कमी वयातील मुलांना निवडून बनविले जाते आणि अख्खे गाव या लग्नात येऊन मौजमज्जेसाठी या सोहळ्यात सामील होते.
या मुलांची निवड केली जाते
बडोदिया गावातील कोणत्याही मुलाची निवड यासाठी डोळेझाकून केली जात नाही. तर ज्यामुलाचे जानवे परिधान केल्याचे संस्कार झालेले नाहीत केवळ अशाच मुलाची या लग्नासाठी निवड केली जाते. या लग्नाला येथील राजस्थानातील या गावातील लोक ‘गेरिया’ असे संबोधतात. गावचा प्रमुख चतुर्दशीच्या रात्री गावातील दोन मुलाची या अनोख्या विवाहासाठी निवड करीत असतो. आणि संपूर्ण गावाच्या उपस्थितीत हसतखेळत हा अनोखा सोहळा पार पडत असतो. गावातील लोक रात्रभर गाणी गातात आणि एकमेकांची फिरकी घेतात. संपूर्ण गाव शुभ मुहूर्तावर होलिका दहन सोहळ्यात सामील होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ होताच एकमेकांना रंगांनी भिजवत होळी साजरी केली जात असते.