युके : 29 नोव्हेंबर 2023 | जगभरात ॲपल कंपनीच्या आयफोनचे असंख्य वापरकर्ते आहेत. सर्वसामान्य मोबाइलच्या किंमतीपेक्षा त्याची किंमत जास्त असली तरी त्याची सर्व्हिस उत्तम असल्याने पैसे खर्च करून अनेकजण हा फोन विकत घेतात. मात्र युकेमधल्या एका महिलेच्या आयफोनमध्ये अत्यंत विचित्र समस्या निर्माण झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून ती या समस्येचा सामना करतेय. अँजिली सोफिया नावाच्या या महिलेल्या आयफोनमध्ये दररोज सकाळी 9.25 वाजता अलार्म वाजतो. विशेष म्हणजे त्या वेळेत तिने कोणताही अलार्म लावलेला नाही. तरीसुद्धा दररोज त्याच वेळी मोबाइलमध्ये अलार्म वाजू लागतो. सोफियाने तिच्या टिकटॉक व्हिडीओमध्ये ही समस्या बोलून दाखवली आहे. किंबहुना ॲपलचे कर्मचारीसुद्धा तिची समस्या पाहून चकीत झाले आहेत.
‘सकाळी 9.25 वाजता मी मरणार आहे का? खरं सांगायचं झाल्यास, दररोज सकाळी या वेळेत माझ्या मोबाइलमध्ये अलार्म वाजू लागतो. तेसुद्धा कधीच न चुकता. मी त्या वेळेसाठी कोणताच अलार्म कधीच लावला नाही. तरीसुद्धा तो अलार्म दररोज त्याच वेळेत वाजतो’, असं ती या व्हिडीओत म्हणतेय. चार ते पाच वर्षांपूर्वी ही समस्या अचानक सुरू झाल्याचं सोफियाने सांगितलं. “मी माझा फोन कित्येक वेळा तपासला. मात्र त्यात कोणताही अलार्म सेट केल्याचं दिसत नाहीये. विशेष म्हणजे ज्यावेळी माझा फोन सायलेंट मोडवर नसतो, तेव्हाच तो अलार्म वाजतो. जोपर्यंत मी तो अलार्म ‘snooze’ किंवा ‘stop’ करत नाही, तोपर्यंत तो वाजत राहतो”, असंही ती पुढे म्हणाली.
या गोष्टीला वैतागून सोफियाने नवीन फोनसुद्धा विकत घेतला होता, पण नव्या फोनमध्येही पुन्हा तिच समस्या निर्माण झाली. या समस्येमागचं कारण ॲपलच्या कर्मचाऱ्यांनाही समजू शकलेलं नाही. अखेर सोफियाने सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करून नेटकऱ्यांकडे मदत मागितली. काहींनी तिला फॅक्टरी रिसेटचा पर्याय सांगितला. मात्र तसं करण्यास तिने साफ नकार दिला.
नेटकऱ्यांनी काही पर्याय सुचवले आणि सोफियाने तसं करूनही पाहिलं. क्लॉक, कॅलेंडर, रिमाईंडर्स आणि अलार्म वाजू शकतील असे ॲप्ससुद्धा तिने डिलिट केले. मात्र त्याचाही काहीच परिणाम झाला नाही. “आता या क्षणी मला खरंच असं वाटतंय की मी अजून काहीच करू शकत नाही”, असं म्हणताना सोफियाच्या डोळ्यात पाणी आलं.
फॅक्टरी रिसेट केल्याने फोनमधील सर्व डेटा उडून जातो. त्यामुळे फक्त अलार्ममुळे ते सर्व गमावण्यास तयार नसल्याचं सोफियाने स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे मला या समस्येला जिंकू द्यायचं नाहीये. फॅक्टरी रिसेट केलं की मी सगळंच गमावेन, असंही ती म्हणाली.