महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रहिवाशी शिवदीप लांडे बिहारमध्ये आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी नुकताच आपल्या आयपीएस सेवेचा राजीनामा दिला. बिहारमधील सिंघम म्हणून ओळख असलेल्या शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्यामुळे सर्वसामान्य लोकांना धक्का बसला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एक वृद्ध रडणाऱ्या अवस्थेत त्यांची भेट घेतल्याचे दिसत आहे. दोन तास हे वृद्ध शिवदीप लांडे यांची भेट घेण्यासाठी थांबले होते. त्या भेटीनंतर त्यांना रडू कोसळल्याचे शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना शिवदीप लांडे यांनी म्हटले आहे की, वृद्ध व्यक्तीला भेटण्याचा तो क्षण खूप भावूक होता. ते खूप भावनाविवश झाले होते. त्याचे हे अश्रू असेच वाया जाऊ देणार नाही. त्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. त्याच्या पोस्टला हजारो जणांनी लाईक केले आहे. अनेकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. कॉमेंटमध्येत तर सर्वांनी त्यांना राजीनामा मागे घ्यावा, असा प्रेमाचा आग्रह केला आहे.
व्हिडिओसोबत आयपीएस शिवदीप लांडे यांनी भावूक करणारा संदेश लिहिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी राजीनामा दिल्यानंतर अनेक युवक मला भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. हजारो जणांचे संदेश मला मिळत आहे. अनेक जण माझ्या सरकारी निवासस्थानाच्या बाहेर येत आहेत. परंतु मी कोणाला भेटू शकत नाही. परंतु त्यांचे हे प्रेम माझ्यापर्यंत पोहचत आहे. एक 80 वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती मला भेटण्यासाठी दोन तासांपासून थांबला होता. ते सतत भेटण्याचा आग्रह करत होतो. त्यामुळे मी त्याला भेटलो. त्यावेळी ते आपल्या भावना रोखू शकले नाही. त्यांचे आश्रू असेच वाया जाऊ देणार नाही. माझी जबाबदारी आणखी वाढली आहे.
अकोला जिल्ह्यातील रहिवाशी असलेले शिवदीप वामनराव लांडे हे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे आई वडील हे सर्वसामान्य शेतकरी वर्गातील आहेत. ते अकोला जिल्ह्यात अनेक समाजिक उपक्रम राबवतात. तसेच अकोल्यातील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस आणि वसतिगृह चालवणाऱ्या संस्थेला दान करत असतात.