मुंबई: महाराष्ट्रात सध्या भूकंपाचे हादरे बसतायत. शिंदे गट (Shinde Group) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातली दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शिंदे गट काही माघार घ्यायला तयार नाही आणि शिवसेना सुद्धा आता शिवसेना वाचवायला मैदानात उतरलीये. राजकीय खळबळ सुरूच आहे. शिवसेना वाचवायला, शिवसेनेसाठी लढायला संपूर्ण ठाकरे (Thackrey) कुटुंबीयच मैदानात उतरलंय. शिवसैनिक मागे का राहतील? शिवसैनिक कायमच चर्चेत असतात. आताही बऱ्याच ठिकाणी पोस्टरबाजी सुरुये, आंदोलनं सुरु आहेत. शिवसैनिक शक्य असेल तितके प्रयत्न करतोय. सोशल मीडियावर सुद्धा अनेक पोस्ट वायरल केल्या जात आहेत. कधी विरोधात, कधी समर्थनार्थ! असाच एक व्हिडीओ वायरल होतोय ज्यात शिवसैनिक चक्क प्रतापगडाच्या पायथ्यापासून लोटांगण घालायला सुरुवात करतायत ते थेट आई तुळजाभवानीच्या मंदिराजवळच जाऊन थांबतायत! कशासाठी? फक्त शिवसेनेसाठी!
हा व्हिडीओ आहे प्रतापगडावरचा! शिवसेना आणि महाराष्ट्रावर आलेलं संकट दूर करण्यासाठी शिवसैनिक लोटांगण घालताना दिसून येतायत. सांगलीतील अनेक शिवसैनिकांचा यात सहभाग आहे. शिवसेनेचे सांगली शहर प्रमुख मयूर घोडके हे इतर कार्यकर्त्यांसोबत साकडं घालताना दिसून येतायत. फक्त हा व्हिडिओचा नाही तर असे अनेक व्हिडीओ आहेत जे वायरल झालेले आहेत. ट्विटर फेसबुकवर सुद्धा अनेक मिम्स शेअर केले जात आहेत. पण हा लोटांगण घालत असतानाच व्हिडीओ मात्र प्रचंड व्हायरल झालाय.
शिवसेनेचे सांगली शहर प्रमुख मयूर घोडके म्हणाले, आज जे महाराष्ट्रावर संकट आलेलं आहे ते संकट दूर होण्यासाठी सांगली शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही आई तुळजाभवानीला साकडं घालायला आलेलो आहोत. प्रतापगड किल्ल्याचा पायथा ते तुळजाभवानी माता मंदिरापर्यंत आम्ही लोटांगण घालत जाणार आहोत. महाराष्ट्रावरील संकट दूर झालं पाहिजे इतकीच आमची इच्छा आहे. आमच्याच घरात जी फूट पडलीये, आमच्याच घरात जी भांडणं होत आहेत ही भांडणं कुठंतरी थांबली पाहिजेत. जी माणसं रुसून रागावून गेलेली आहेत त्यांना आई तुळजाभवानीने सद्बुद्धी देवो, माणसं परत घरी येवो अशी आमची प्रार्थना आहे. शिवसेनेला कुणाचीतरी नजर लागलेली आहे.