मुंबई : चूक कधी बरोबर असू शकत नाही. विकृतीचं कधी समर्थन होऊ शकत नाही. पण विकृतीवर घाव घालत बसणाऱ्यांपेक्षा डोकं ठिकाणावर आणणाऱ्या गोष्टींची खरी गरज आज व्यक्त होते आहे. अभिनेत्री केतकी चितळेच्या शरद पवारांवरील (Ketaki Chitale Facebook Post) पोस्टनंतर तिला ट्रोल करणाऱ्या कनेक्ट कमेन्ट्स (Comments), अनेक प्रतिक्रिया आणि अनेक फेसबुक पोस्ट समोर आल्या आहेत. मात्र या सगळ्यात विकृत मानसिकतेचं डोकं ठिकाणावर आणणाऱ्या काही मोजक्या, पण महत्त्वाच्या फेसबुक पोस्ट (Facebook Post) प्रत्येकानं वाचल्या पाहिजे. अशा तीन महत्त्वाच्या फेसबुक पोस्ट विचार करायला लावणाऱ्या आहेत. पत्रकार रवींद्र आंबेकर, आलोक देशपांडे (Ravindra Ambekar & Alok Deshpande) यांनी व्यक्त केलेली मतं अत्यंत संतुलित, विचार करायला भाग पाडणारी आणि डोकं ठिकाणावर आणणाऱ्या फेसबुक पोस्ट वाचायलाच हव्यात.
पत्रकार रवींद्र आंबेकर यांनी म्हटलंय, की
कँसर हा भयानक आजार आहे. या आजारामुळे केवळ रूग्ण नाही तर संपूर्ण परिवार उद्ध्वस्त होतं. काही थोडेच लोकं या आजारावर मात करून बाहेर पडतात. कँसरग्रस्त रूग्णाच्या सोबत तुम्ही चार महिने काढले की तुम्हाला आयुष्य आणि वेदना काय असते हे समजून येते. जे लोक वाचले त्यांना अनेकदा विकृतींना सोबत घेऊन जगावं लागतं.
यामुळे अनेकांचा आत्मविश्वास ही जातो आणि अशी माणसं एक जीवंत शवासारखं जगतात. शरद पवार यांनी कँसर वर मात केलीच पण त्या सोबत आलेल्या विकृतीला ही अत्यंत सहजपणे कॅरी केलं. एकेका सर्जरीला किती वेदना होतात हे फक्त रूग्ण जाणतो, तरीही शरद पवार उभे राहिले, लढले. त्यांच्याशी तुमचा वाद असू शकतो, पण त्यांच्या आजारपण, वय, विकृती-व्यंग यावर काहीही टिप्पणी करताना एक लक्षात घ्या या आजाराशी सामना करणाऱ्या लाखों लोकांच्या मानसिकतेवर ही तुम्ही आघात करत आहात.
आलोक देशपांडे लिहितात की,
केतकी चितळे नामक एका अभिनेत्रीने शरद पवार यांच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करणारी एक अत्यंत घाणेरडी पोस्ट तिच्या फेसबुक भिंतीवर लिहिली आहे. ही चितळे किंवा त्या पोस्ट खाली ज्या भावे चे नाव आहे तो, या लोकांना दुसऱ्यांच्या मृत्यूचे किंवा विध्वसाचे इतके आकर्षण का असते? सगळ काही उध्वस्त व्हावं, माणूस मरावा, दंगली व्हाव्यात, लोकांनी एकमेकांना शिव्या घालाव्यात, दुसऱ्या जाती- धर्माच्या माणसाबद्दल सतत द्वेषपूर्ण बोलावे, माझा जो विचार तोच श्रेष्ठ आणि वेगळा विचार मांडणाऱ्या व्यक्ती जगातून नाहीश्या व्हाव्यात याची इच्छा करावी, दुसऱ्याला माझ्या आदेशावर नाचवावे, त्याचे कपडे आणि खाणे मी ठरवावे ही असलीच नीच मानसिकता या लोकांची का असते?
ही चितळे किंवा भावे हा मुद्दा नाही. ही झुरळ आहेत. घाणीत तोंड घालणारी आणि त्यावर पोट भरणारी. ते ज्या विचारसरणीला समर्थन करतात तो प्रॉब्लेम आहे. ती आज या देशावर आक्रमकरित्या सत्ता गाजवत आहे. हिंसा, खून, मरण यात आनंद मानणारी हि विचारसरणी आहे. संघटित जनमताने त्याचा कडाडून विरोध, त्या विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तींना समाजात प्रतिष्ठा नाकारणे आणि राजकीय दृष्ट्या त्या विचारसरणीचा पराभव हा यावर एकमेव उपाय आहे.