मुंबई: जगात प्रतिभेची कमतरता नाही. असे लोक आहेत जे आपल्या प्रतिभेने सर्वांना आश्चर्यचकित करतात, आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. तसं तर प्रत्येकाकडे वेगळ्या प्रकारचं कौशल्य असतं. काहींमध्ये गायनाची तर काहींमध्ये नृत्याची प्रतिभा आहे. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने आपल्या गायनाच्या प्रतिभेने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. खरं तर या व्यक्तीने एक-दोन नव्हे तर पंजाबी, गुजराती आणि तमिळ, तेलुगूसह एकूण 7 भाषांमध्ये केसरिया गायलं आहे. त्या व्यक्तीचं हे कौशल्य पाहून उद्योगपती आनंद महिंद्राही फॅन झाले आहेत.
आनंद महिंद्रा यांना तुम्ही ओळखत असालच. ते देशातील नावाजलेले उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आहेत. आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून ते सोशल मीडियावर बराच वेळ घालवतात आणि वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. कधी कधी त्यांचे व्हिडिओ लोकांना अनेक गोष्टी शिकवून जातात. काही व्हिडिओ लोकांचे मनोरंजनही करतात. सध्या त्यांनी शेअर केलेला व्हिडिओही खूप मनोरंजक आणि भन्नाट आहे.
व्हिडिओमध्ये एक पंजाबी व्यक्ती ‘केसरिया’ हे गाणे आधी मल्याळम, नंतर पंजाबी, नंतर तेलुगू, नंतर तमिळ, कन्नड, गुजराती आणि शेवटी हिंदीत गाताना दिसत आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये स्विच होताना त्याचा सूर अजिबात हलत नाही. ते गाणं जणू त्याच भाषेत बनवलं आहे, अशा प्रकारे तो प्रत्येक भाषेत गाणं गातो. यालाच खरी प्रतिभा म्हणतात.
Here’s evidence that the first clip of @SnehdeepSK was no fluke & that he really has language skills.. He passed this test brilliantly. Once again, in a polarised world, it’s so comforting to hear voices that are unifying… pic.twitter.com/hhwYxc7sLN
— anand mahindra (@anandmahindra) April 8, 2023
आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हा शानदार व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, या व्यक्तीकडे खरोखरच भाषा कौशल्य आहे, त्याचा आवाज ऐकणे खूप दिलासादायक आहे. एक मिनिट 25 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाख 36 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 18 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक करत विविध कमेंट्सही केल्या आहेत.