मुंबई, दि. 15 फेब्रुवारी 2024 | राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. परंतु मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केल्यापासून या विषयाची चर्चा देशभरात झाली. मनोज जरांगे पाटील यांची महत्वाची कुणबी जातीच्या उल्लेखाची मागणी मान्य झाली. कुणबी प्रमाणपत्र असलेल्या लोकांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची अधिसूचना काढण्यात आली. आता या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. यामुळे राज्य सरकारने २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवले आहे. त्यात हा विषय मंजूर होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीस मराठा समाजातून नारायण राणे आणि इतर काही जणांनी उघड विरोध केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर शंभर वर्षांपूर्वीची बातमी व्हायरल झाली आहे. त्या बातमीत मराठा की कुणबी याची माहिती दिली आहे.
26 फेब्रुवारी 1931 च्या वृत्तपत्र, साप्ताहिक किंवा मासिकात आलेली ही बातमी दिसत आहे. बातमी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे, त्याचा उल्लेख नाही. परंतु बातमीची तारीख स्पष्ट दिसत आहे. या बातमीत म्हटले आहे की, वार्षिक मनुष्यगणती (जनगणना) होणार आहे. त्यावेळी जनगणना करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला आपली जात ‘मराठा’, अशी स्पष्टपणे सांगावी. कुणबी, मराठी वगैरे सांगू नये. काही मराठा जातीचे लोक इतर व्यवसाय करतात. त्या व्यवसायावरुन सुतार, लोहार, न्हावी वगैरे जाती सांगतात. सध्या मराठा बांधव शिंपी, सोनार हे व्यवसाय करत आहेत. तरी त्या व्यवसायाची (धंदे) जात न सांगता ‘मराठा’ असाच उल्लेख करावा. गणनेसाठी आलेल्या व्यक्तीला ‘मराठा’ जातच लिहून घेण्यास सांगावे. सुज्ज्ञ जाणत्या मराठ्यांनी अडाणी मराठ्यास जात मराठा असे लिहिण्यास सांगावे. तसेच गणना करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने तसे लिहिले की नाही, याची खात्री करुन घ्यावी.
एक मराठा
सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होत आहे. बातमी कुठे प्रसिद्ध झाले ते दिले नसले तरी त्या बातमीवर कॉमेंट करुन शेअर केली जात आहे. यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. बातमीच्या शेवटी एक मराठा इतकेच दिले आहे. म्हणजे यासंदर्भात आवाहन कोणी केले आहे, ते स्पष्ट होत नाही.
हे ही वाचा
मराठा आरक्षणाचा जीआरमध्ये कशी केली सगेसोयऱ्याची व्याख्या, वाचा संपूर्ण जीआर