सुरत : कोणतंही शुभ कार्य करण्याआधी हिंदू संस्कृतीमध्ये सर्वप्रथम गणरायाची पुजा करण्यात येते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाची गणपतीवर आस्था, श्रद्धा असते. महाराष्ट्रामध्ये गणेश चतुर्थीच्या अनेक दिवस आधीच गणरायाच्या आगमनाची तयारी जोरात आणि उत्सात सुरु असते. गणेश चतुर्थीमध्ये संपूर्ण राज्यात आनंद आणि भक्तीमय वातावरण असतं. मोठ-मोठ्या सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची स्थापना करण्यात येत आणि मंडळातील गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमलेली असते. गणेश चतुर्थी १० ते १२ दिवस अनेक गणेश मुर्ती भक्तांना पाहायला मिळतात.
गणपतीच्या मुर्तीची कोणतीही किंमत नसते. पण जेव्हा आपण मुर्तीकाराकडून गणरायाची मुर्ती घेतो तेव्हा त्यासाठी आपण पैसे मोजतो. १०० रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत भक्त गणरायाची मुर्ती खरेदी करतात आणि आपल्या घरी स्थापना करतात. काही तर तब्बल लाखो रुपयांच्या गणेश मुर्तीची स्थापना करतात. पण तुम्ही कधी ५०० कोटी रुपयांची गणेश मुर्ती पाहिली किंवा ऐकली आहे का? आज आपण अशाच मूर्तीबद्दल जाणून घेणार आहोत.
गणरायाची ५०० कोटी रुपयांची मूर्ती फार विशाल नाही, मुर्तीची उंची फक्त २.४४ सेंटीमीटर आहे. पण ही गणरायाची मूर्ती एका अनकट हिऱ्यातून साकारण्यात आली आहे. म्हणून या गणेश मूर्तीची किंमत तब्बल ५०० कोटी रुपये आहे. पाहाताना तुम्हाला ही मूर्ती पांढऱ्या क्रिस्टल पासून तयार करण्यात आल्याचं दिसत आहे. पण हा एक हीरा आहे, जो हुबेहूब गणरायाच्या मूर्तीप्रमाणे दिसत आहे.
गणरायाची ही महागडी मूर्ती सुरत येथील उद्योजक राजेश भाई पांडव यांच्याकडे आहे. राजेश भाई पांडव सुरत येथे उद्योजक आहेत. जेव्हा पांडव यांच्या घरी ५०० कोटी रुपयांच्या गणेश मूर्तीचं आगमन झालं, तेव्हापासून त्यांच्या यशामध्ये प्रचंड वाढ झाल्याचं राजेश भाई पांडव यांच्या कुटुंबाने सांगितलं आहे.
राजेश भाई पांडव यांना ही मूर्ती दक्षिण अफ्रिकेत सापडली. २००५ साली जेव्हा निलामी होत होती, तेव्हा एक सामान्य हिरा म्हणून मूर्तीची विक्री करण्यात आली. पण राजेश भाई पांडव यांना त्या हिऱ्यामध्ये गणरायाचं दर्शन झालं. म्हणून त्यांनी ती मूर्ती खरेदी केली. जेव्हा राजेश भाई पांडव यांनी मूर्ती खरेदी केली, तेव्हा त्याची किंमत फक्त २९ हजार रुपये होती.