इंदूर: कुटुंबीय, नातेवाईक किंवा जवळच्या मित्राचा मृत्यू झाल्यानंतरच लोक स्मशानभूमीत जातात, पण मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे स्मशानभूमीत कुणालाही अपेक्षित नसलेला फलक लावण्यात आलाय. इथल्या प्रशासनाला तो लावावा लागलाय. इथले स्थानिक लोक स्मशानभूमीत निवांत बसून आपला वेळ घालवतात. दिवसेंदिवस हा उगाचच येऊन बसणाऱ्यांचा त्रास इतका वाढला की अशा तऱ्हेने इंदूरच्या स्मशानभूमीत समितीला ठिकठिकाणी इशारा फलक लावावे लागले. ज्यावर लिहिले, “विनाकारण बसण्यास मनाई आहे”.
इंदूर शहराच्या मध्यभागी तीन एकरात बांधलेले रामबाग मुक्तीधाम हे स्वच्छ आणि सुंदर मुक्तीधामांपैकी एक आहे. येथील झाडे आणि हिरवळ यामुळे अनेक प्राणी-पक्षी येथील झाडांजवळ फिरतात. पक्ष्यांना खाऊ घालण्यासाठीही लोक इथे येतात. पण त्याशिवाय दिवसातून अनेकदा अमली पदार्थांचे व्यसन करणारेही स्मशानभूमीत शिरून इकडे तिकडे बसतात. यामुळे मुक्तीधाम समिती नाराज झाली असून स्मशानभूमीत लोकांना रिकामे बसू नका, असा इशारा देणारे फलक लावण्यात आले आहेत.
स्वच्छतेत इंदूर पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मुक्ती धाममध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. इथली फुले आणि झाडे त्याचे सौंदर्य आणखी वाढवतात, पण येथे येणाऱ्या असामाजिक घटकांमुळे फुले आणि वनस्पतींचे नुकसान होते. त्यामुळे नाराज झालेल्या समितीने हा निर्णय घेतला. मुक्तीधाममध्ये रिकाम्या बसलेल्या लोकांसाठी फलक लावावे लागले. या गोंधळामुळे संतप्त झालेल्या मुक्तीधाम समितीच्या सदस्यांनी पोलिसांकडे देखील तक्रार केली.