मुंबई : 22 फेब्रुवारी 2024 | जिभेचे चोचले पुरवणारा वडापाव आवडत नाही अशी क्वचित एखादी व्यक्ती असेल. मुंबईतील असंख्य गल्ल्यांमधील गाड्यांवर, छोट्या-मोठ्या रेस्टॉरंटमध्ये वडापाव आवर्जून चाखायला मिळतो. अगदी गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत या खाद्यपदार्थाची चव चाखण्यास नेहमीच तयार असतो. असा हा वडापाव असंख्य मुंबईकरांचाच नव्हे तर जगभरातील अनेकांचा आवडता पदार्थ आहे. वडापाव हा शब्द ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. तर अनेकांसाठी हा पोट भरण्याचा स्वस्त पर्याय आहे. मुंबईकरांची वडापावशी भावनिक कनेक्शन आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. अशातच मुंबईतच राहणाऱ्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने वडापावबद्दल अशी टिप्पणी केली आहे, जी ऐकून नेटकऱ्यांचा पारा चढला आहे.
कंटेट क्रिएटर साक्षी शिवदासानीचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर चार लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. नुकतंच तिने ‘हॅविंग सेड दॅट’ या टॉक शोमध्ये मुंबईच्या प्रसिद्ध वडापावविषयी अशी टिप्पणी केली आहे, जे ऐकून शोचे होस्टसुद्धा थक्क झाले. ‘तू नक्की मुंबईचीच आहेस ना’, असा सवाल मुलाखतकर्त्याने तिला विचारला. त्यावर साक्षी म्हणते, “वडापाव कचरा आहे. मला तो अजिबात आवडत नाही.” उकडलेले बटाटे आणि ब्रेड यांचा काही ताळमेळ नसल्याचं तिने म्हटलंय. वडापावबद्दल साक्षीचं हे मत ऐकून नेटकऱ्यांनाही अजब वाटलं. अनेकांनी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कमेंट बॉक्समध्ये साक्षीला जोरदार ट्रोलसुद्धा करण्यात आलं आहे.
वडापावबद्दल साक्षीचं मत ऐकल्यानंतर शोचा होस्ट तिला म्हणतो, “सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे बटाटे उकडलेले नाही तर तळलेले असतात. दुसरी गोष्ट म्हणजे ब्रेड नव्हे तर पाव असतो. बटाटा वडा आणि पाव यांना चटणी-मिर्चीसोबत खायला दिलं जातं.” मात्र साक्षी तिच्या मतावर ठाम होती. ती पुढेही वडापाववर टीका करत जाते. त्यानंतर स्नॅक्सची किंमत आणि वाइब्स यांविषयी ते चर्चा करू लागतात. अखेर साक्षी निष्कर्ष काढत म्हणते की मला वडापावपेक्षा समोसा पाव जास्त चांगला वाटतो.
साक्षीच्या या व्हिडीओला आतापर्यंत 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 47 हजारांपेक्षा अधिक लोकांनी त्याला लाइक केलंय. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत साक्षीवर टीका केली आहे. ‘तुझ्या उच्चारांपेक्षा वडापाव हा 100000000000 पटींनी जास्त चांगला आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘तुझे वडापावबद्दल जे विचार आहेत, तेच आमचे तुझ्याबद्दल आहेत’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे.