मुंबई : 12 जानेवारी 2024 | अवघ्या पाच वर्षांत उभारण्यात आलेल्या देशातील सर्वांत लांब सागरी सेतूचं आज (शुक्रवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या सेतूसाठी पाच बोईंग विमानं, 17 आयफेल टॉवर यांच्या वजनाइतका पोलाद वापरला गेला आहे. तर 84 हजार टन वजनाचे 70 स्टील डेक बसवण्यात आले आहेत. हा सेतू म्हणजे आधुनिक अभियांत्रिकी विश्वातील आविष्कार समजला जातोय. या सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई या शहरांमधील प्रवासाचं अंतर कमी होणार आहे. मुंबईहून पुणे, कोकण तसंच पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने वाहनांसाठी हा सेतू वेगवान पर्याय ठरणार आहे. हा सागरी सेतू रात्रीच्या अंधारात आणखीनच आकर्षक दिसून येतो. त्याचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘महिंद्रा अँड महिंद्रा’चे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीच हा व्हिडीओ शेअर केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी या सागरी सेतूला ‘गोल्डन रिबिन’ असं म्हटलंय. ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा हा रात्रीचा व्हिडीओ. अत्यंत मेहनती आणि प्रतिभावान इंजीनिअर्सच्या अप्रतिम कामामुळे कनेक्टिव्हिटी आणि कॉमर्स या दोन्ही गोष्टी वाढतील. या गोल्डन रिबिनवर ड्राइव्ह करण्याची मी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही’, असं त्यांनी लिहिलं आहे.
A night-time video of the Mumbai Trans harbour link. Connectivity & Commerce will be enhanced through the Commitment of hard-working, talented engineers.
Can’t wait to drive down this ‘golden ribbon.’Ack: @rajtoday pic.twitter.com/7vZ88jzGU8
— anand mahindra (@anandmahindra) January 10, 2024
या सागरी सेतूसाठी 2018 मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली होती. त्यातही कोरोनाचं संकट असतानाही पाच वर्षांत हा सेतू उभारण्यात आला. या पुलाला ‘अटल सेतू’ असं नाव देण्यात आलं आहे. या अटल सेतुमुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर हे 20 ते 22 मिनिटांत पार करता येणार आहे.