मुंबई: Online Shopping करणं म्हणजे जितकं ते सोपं वाटतं तितकंच अवघड. इंटरनेटचं जाळं सर्वदूर पसरलेलं आहे. घरबसल्या आज आपण काहीही मागवू शकतो, त्यासाठी आपल्याला दुकानात जायची गरज नाही. पण याने आपला नुसताच फायदा होतोय का? नाही. यात अनेक नुकसान आहेत. जसं जसं इंटरनेटचं जाळं वाढत गेलं, गोष्टी सोप्या होत गेल्या तसतसं ऑनलाइन होणारी फसवणूक देखील वाढली. ही फसवणूक कशीही होऊ शकते. आजकाल असे अनेक किस्से समोर येतायत. लोकं ऑनलाइन मागवतात काहीतरी एक आणि येताना येतं काहीतरी एक. तुमच्याही बघण्यात अशा अनेक गोष्टी आल्या असतील किंवा कदाचित तुमच्या सोबतही असं काही घडलेलं असू शकतं.
असाच एक किस्सा घडलाय. एका महिलेला तिने ऑर्डर न केलेल्या गोष्टीसाठी ५८ हजार रुपये भरावे लागलेत. काय किस्सा आहे हा? जाणून घेऊयात. झालं असं की या महिलेच्या घरी एक पार्सल आलं आणि तिच्या अकाउंट मधून तब्बल ५८ हजार रुपये कट झाले. हे पार्सल होतं कंडोमचं. हैराण करणारी गोष्ट तर ही आहे की हे पार्सल अमेझॉन वरून आलं आणि यात तब्बल एक हजार कंडोम होते. या बदल्यात महिलेच्या क्रेडिट कार्डवरून ७०० डॉलर म्हणजेच ५८ हजार रुपये कापण्यात आले. हे पार्सल जेव्हा घरी आलं तेव्हा ही महिला एका हॉस्पिटलमध्ये तिच्या पतीची सेवा करत होती. इतके पैसे कापले गेलेले बघून तिने पटकन सगळं तपासलं तर तिला हा प्रकार लक्षात आला.
मग आता करायचं काय? तिने अमेझॉन मध्ये याबाबत तक्रार केली. अमेझॉन ने ते पार्सल परत घेण्यास नकार दिला कारण कंडोम ही फार पर्सनल गोष्ट असल्याचं अमेझॉनचं म्हणणं होतं. बऱ्याच खटाटोपानंतर शेवटी अमेझॉनने ते पार्सल परत घेतलं आणि महिलेला हे पैसे परत दिले. न्यूयॉर्क पोस्टने यासंदर्भात बातमी केलीये. जी गोष्ट आपण मागवली नाही ती गोष्ट येणे, त्याचे इतके जास्त पैसे कापले जाणे आणि यासंदर्भातली तक्रार केल्यास त्याचीही पटकन दखल न घेतली जाणे या सगळ्याने ही महिला गोंधळून गेली. ऑनलाइन शॉपिंगच्या अशा अनेक घटना व्हायरल होत असतात. तुम्हीही अशी शॉपिंग करताना काळजी घ्या.