इस्लामाबाद : पाकिस्तानातील मच्छिमाराला समुद्रातून जणू घबाडच सापडलं. बलुचिस्तानातील ग्वाडार (Gwadar) किनारी जाळं पसरुन बसलेल्या मच्छिमाराच्या जाळ्यात 48 किलो वजनाचा अटलाँटिक क्रोकर फिश (कीर – Atlantic croaker fish ) अडकला. या माशाला लिलावात तब्बल 46 हजार 706 अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास 72 लाख रुपयांची बोली लागली. जिवानी फिश मार्केटमध्ये झालेला हा विक्रमी महाग व्यवहार मानला जातो. या व्यवहारामुळे मच्छिमार रातोरात लक्षाधीश झाला. (Pakistan Balochistan Fisherman Catches Rare 48-kg Atlantic Croaker Fish Sells for whopping Price)
दीड लाख रुपये प्रतिकिलो दर
मत्स्यव्यवसाय उपसंचालक अहमद नदीम यांनी स्थानिक वृत्तपत्रांना दिलेल्या माहितीनुसार संबंधित मच्छिमार ग्वाडारमधील पिशुकन गावातील रहिवासी आहे. जिवानी समुद्रकिनारी त्याला हा मासा सापडल्याचं बोट मालक साजिद हाजी अबु बक याने सांगितलं. बाजारभावानुसार कीर या दुर्मिळ माशाची किंमत 30 हजार रुपये प्रतिकिलो इतकी ठरली होती. चीन, युरोप सारख्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये या माशाची मागणी प्रचंड आहे. अखेर हा मासा 1,50,000 (दीड लाख) रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला. म्हणजेच 48 किलो वजनाच्या या माशाला 72 लाख रुपयांची किंमत आली.
मूत्राशयामुळे मूल्यवान
बहुतांश मासे त्यांचं मास, त्वचा किंवा हाडं यासाठी प्रसिद्ध असतात, मात्र या माशाचं महत्त्व त्याच्या मूत्राशयामुळे (air bladder) वाढतं, असं पर्यावरण विकास प्राधिकरणाचे सहाय्यक संचालक आणि सागरी जीवशास्त्रज्ञ अब्दुल रहीम बलोच यांनी सांगितलं. वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील उच्च मागणीमुळेही हा मासा बहुमूल्य मानला जातो.
रत्नागिरीत 150 किलोपेक्षा अधिक वजनाचा मासा
रत्नागिरी येथील काळबादेवीतील समुद्रात मच्छीमार संदेश मयेकर यांना 150 किलोपेक्षा अधिक वजनाचा मासा सापडला. सहा फूट रुंद आणि सात फुटांहून अधिक लांब असलेल्या माशाचं वजन तब्बल 150 किलोपेक्षा अधिक आहे. तोत्के चक्रीवादळामुळे मासेमारी करणाऱ्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झालाय. चक्रीवादळात समुद्रात जाण्याची त्यांना परवानगी नसते, अशातच ते वादळ निवळल्यानंतरही मासे लागलीच जाळ्यात सापडत नाहीत, एकीकडे हंगाम संपत आला असताना समुद्रातून मासे गायब झालेत. तर दुसरीकडे यात संदेश मयेकर यांना वाघळी माशाच्या स्वरूपात लॉटरी लागलीय. मात्र कोरोनामुळे या वाघळीला फारसा दर मिळालेला नाही.
संबंधित बातम्या
Video : भेदक नजर, विजेसारखा वेग, मांजरीने केलेली ‘ही’ शिकार एकदा पाहाच
VIDEO| आश्चर्य! रत्नागिरीच्या समुद्रात सापडला 150 किलोचा भलामोठा वाघळी मासा
(Pakistan Balochistan Fisherman Catches Rare 48-kg Atlantic Croaker Fish Sells for whopping Price)