कोलकाता: कोलकाता मध्ये नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला जातो. आपल्याकडे महाराष्ट्रात जसा गणपती बसवला जातो, त्याची जितकी धामधूम असते तितकीच धामधूम कोलकाता मध्ये दुर्गा पूजेची धामधूम असते. आपल्याकडे गणपतीत वेगवेगळी मंडळे असतात, त्या मंडळांमध्ये गणपती बसवताना वेगवेगळ्या थीम्सचा वापर केला जातो. एक थीम ठरवली जाते आणि तशा पद्धतीने गणपतीची सजावट केली जाते, हो ना? अगदी असंच कोलकाता मध्ये केलं जातं. आपल्याकडे ज्याला आपण मंडळ म्हणतो तिकडे त्याला पंडाल म्हटलं जातं. या पंडालमध्ये खूप सदस्य असतात. हे सदस्य मिळून ठरवतात की आपल्या पंडालची थीम काय ठेवायची. जी थीम ठरेल त्यानुसार मग सगळी ती सजावट. गणपतीत आपल्याकडे अशी चांद्रयानची थीम खूप ठिकाणी पाहण्यात आली होती. असाच एक कोलकाताचा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक देवी चक्क गोलगप्प्यात बसवलीये. होय! गोलगप्पा, पाणीपुरी, पुचका…बंगाली लोकांच्या भाषेत पुचका थीम मध्ये ही देवी बसवण्यात आलीये.
आजवर आपण महाराष्ट्रात गणपतीच्या काळात अनेक प्रकारच्या सजावटी पाहिल्या, सगळ्या थीम्स पाहिल्या. आता तर नवरात्रोत्सवात कोलकातामधील अनेक व्हिडीओ सुद्धा व्हायरल होतायत. एक-एक थीम हटके आहे. कधी-कधी तर आपल्याला प्रश्न पडतो की लोकांमध्ये इतकी क्रिएटिव्हिटी येते कुठून. हा व्हिडीओ जो व्हायरल होतोय त्यात चक्क पाणीपुरीची थीम आहे. पाणीपुरीची थीम? मग देवी कुठे बसवली? अर्थात पाणीपुरीमध्येच बसवली.
या व्हिडीओच्या सुरुवातीपासूनच आपल्याला पाणीपुरी दिसायला लागते. मंडळाचं मंडप पाणीपुरीने भरलेलं आहे. मंडपच एक एक पुचका लावून सजवण्यात आलाय. जसा जसा व्हिडीओ पुढे जातो, देवीजवळ जाऊन लक्षात येतं की देवी एका फुटलेल्या पाणीपुरीमध्ये बसवलेली आहे. ज्या लोकांना पाणीपुरी प्रचंड आवडते त्या लोकांना या पंडालची ही थीम बघून खूप छान वाटेल. आपण तर पाणीपुरीत देवी बसवण्याचा स्वप्नात देखील विचार करू शकत नाही, हो ना?