ATM मशीनमधून लोक पैसे काढतात, जेणेकरून ते आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडतील. एटीएमची खास गोष्ट म्हणजे याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यातून कुठूनही पैसे काढू शकता. जितके पैसे मागाल तितकेच पैसे खात्यातून हातात येतात. पण कल्पना करा की तुमच्या खात्यातून तुम्ही मागितलेल्या पैशापेक्षा जास्त पैसे, दुप्पट पैसे एटीएम देत असेल तर? असंच एक प्रकरण समोर आलं आहे.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना स्कॉटलंडमधील डुंडी शहरात घडली आहे. इथल्या एका एटीएमने लोकांना दुप्पट पैसे द्यायला सुरुवात केली. हा प्रकार घडताच तिथे लोकांची गर्दी झाली.
इथे असलेल्या चार्ल्सटन ड्राइव वर लावलेल्या एटीएम मशीनमध्ये अचानक असे काही घडले की लोकांनी मागितलेली रक्कम अवघ्या दुप्पटीने बाहेर येऊ लागली.
विशेष म्हणजे त्यांच्या खात्यातून पैसे कट होताना निम्मेच कट व्हायचे, पण हातात मात्र दुप्पट पैसे यायचे. याची माहिती लोकांना मिळताच चेंगराचेंगरी झाली.
लोकांची इतकी गर्दी झाली होती की, प्रत्येकालाच आधी पैसे काढायचे होते. यानंतर पोलिसांना बोलवावे लागले. पोलीस आले त्यांनी पाहिलं लोक अंदाधुंदपणे पैसे काढतायत. पोलिसांनी बँकेला माहिती दिली.
यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवत एटीएम दुरुस्त करण्यात आलं. एटीएम दुरुस्त झाल्यावर तिथली गर्दी हटवण्यात आली. ज्यांनी दुप्पट पैसे काढले आहेत, त्या सर्वांना कायद्यानुसार अर्धे पैसे परत करावे लागतील, असे सांगण्यात येत आहे. बँकेचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला.