बिहारमधील एका विद्यापीठाकडून (Bihar University) मोठं दुर्लक्ष झालंय. ललित नारायण मिथिला विद्यापीठाने नुकतंच विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचं ॲडमिट कार्ड जारी केलंय. याच ॲडमिट कार्ड वरून सगळीकडे चर्चा सुरुये. परीक्षेच्या ॲडमिट कार्डवर (Admit Card) पंतप्रधान नरेंद्र मोदी, महेंद्रसिंग धोनी (Mahendrasingh Dhoni) आणि बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांचे फोटो आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिट कार्ड या प्रमुख व्यक्तींची फोटो आहेत ते विद्यार्थी विद्यापीठाच्या मधुबनी, समस्तीपूर आणि बेगुसराय जिल्ह्यात असलेल्या महाविद्यालयांच्या बीएच्या तृतीय वर्षाचे विद्यार्थी असल्याचे सांगितले जातंय. दरभंगा येथे मुख्यालय असलेल्या ललित नारायण मिथिला विद्यापीठाशी ही महाविद्यालये संलग्न आहेत.
आता या ॲडमिट कार्डबाबत बिहारमध्येच काय तर संपूर्ण देशात जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात एवढा मोठा निष्काळजीपणा कसा झाला, याचा तपास सुरू झाला आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव मुश्ताक अहमद म्हणाले, “या गोंधळाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आलाय. चौकशीचे आदेश देण्यात आले असून संबंधित विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. एफआयआरही दाखल होऊ शकतो.”
“ॲडमिट कार्ड ऑनलाइन दिले जातात आणि संबंधित विद्यार्थ्यांकडून डाउनलोड केले जातात आणि या सर्व विद्यार्थ्यांना विशिष्ट लॉगइन तपशील दिले जातात,हा या विद्यार्थ्यांचा खोडकरपणा आहे” मुश्ताक अहमद म्हणाले. असे दिसते की काही विद्यार्थ्यांनी बेजबाबदारपणे खोडसाळपणा केला आहे” असं विद्यापीठाचे कुलसचिव मुश्ताक अहमद म्हणाले.
“चौकशीनंतर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणामुळे विद्यापीठाचे नाव खराब झाले आहे. पंतप्रधान आणि राज्यपालांच्या छायाचित्रांचा गैरवापर करणे ही देखील गंभीर बाब आहे,’ असंही ते म्हणाले.
काही वर्षांपूर्वी मुजफ्फरपूरमध्ये असंच एक प्रकरण समोर आलं होतं. आई वडिलांच्या नावाने एका विद्यार्थ्याच्या ॲडमिट कार्डवर बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी आणि सनी लिओनी यांची नावं आली होती. या प्रकरणाची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. हे प्रकरण सुद्धा चांगलंच व्हायरल होतंय.