चेन्नई: समुद्रकिनारा! निळाशार समुद्र, शांत किनारा आणि सूर्यास्त ही पर्यटकांना सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट. समुद्रकिनाऱ्यावरचा सूर्यास्त तर, अहाहा…लोकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय! कल्पना करा की सुट्टीच्या दिवशी आपण एखाद्या समुद्रकिनारी बसलेलो आहोत. आजूबाजूला शांतता, हवा थोडीशी दमट पण त्यातही एक वेगळ्या प्रकारचा आनंद, समोर निळाशार समुद्र आणि सूर्यास्त! काहीजण तर हे वाचतानाच रमून गेले असतील. खरंय, कुणालाही सुखावेल अशी ही कल्पना आहे. पण समजा तुम्ही समुद्र पाहायचा म्हणून खूप लांबचा प्रवास करून एखाद्या जागी गेलात आणि तो समुद्र निळा नसून लाल निघाला तर? बापरे! तुम्हालाच काय अशावेळी तर तुमच्यासोबत शास्त्रज्ञांनासुद्धा धक्का बसेल. नेमकं हेच घडलंय! भारतातल्या एका ठिकाणी समुद्राचा रंग लाल झालाय. अर्धा निळा-अर्धा लाल समुद्र बघून शास्त्रज्ञ चक्रावलेत.
पुद्दुचेरीमध्ये देश-विदेशातील अनेक लोक फिरायला येत असतात. हे एक खूप महत्त्वाचं पर्यटनस्थळ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर किनाऱ्यावरील वैथिकुप्पम ते गांधी पुतळ्यापर्यंत किनारपट्टीच्या पाण्याचा संपूर्ण भाग लाल झालाय. आता हा समुद्र अर्धा लाल आणि अर्धा निळा दिसतोय. असा प्रकार बघून पर्यटकांना धक्काच बसलाय, शास्त्रज्ञ सुद्धा चक्रावलेत.
समुद्र हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने पर्यटकांमध्ये गदारोळ माजला. अर्धा निळा, अर्धा लाल समुद्र त्यांनी कधी पाहिलाच नव्हता. शेवटी शास्त्रज्ञांनी जेव्हा याचा अभ्यास केला तेव्हा लाल रंगाचं दुसरं-तिसरं काहीही नसून शेवाळ असल्याचं समोर आलं. समुद्राचा रंग जो अचानक लाल झाला तो औद्योगिक प्रदूषणामुळे झाला असल्याचं कोस्टल मॅनेजमेंट एक्स्पर्ट आणि पॉंडिकन या नागरी संस्थेच्या सदस्यांच्या मत आहे. आता या शेवाळाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत.
गेल्या आठवडाभरात पुद्दुचेरीच्या वैथिकुप्पम आणि समुद्रकिनाऱ्याच्या इतर काही भागात ही घटना घडली आहे. हे एक प्रकारचं रेड टाइड शेवाळ असून सागरी जीवनासाठी अत्यंत हानिकारक असल्याचं म्हटलं जातंय. इतर राज्यातील अनेक ठिकाणी समुद्राचा रंग हिरवा पाहायला मिळाल्याच्या नोंदी आहेत. लाल रंगाचा हा समुद्र पुन्हा निळा करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करतायत, पर्यटकांनासुद्धा तिथे जायला मनाई करण्यात आलीये. या घटनेवरून एक गोष्ट मात्र नक्की कळते ती म्हणजे वेळीच प्रदूषणाला आळा घातला गेला नाही तर भारतातल्या सगळ्याच समुद्रांचे रंग बदलून लाल, हिरवे, पिवळे व्हायला वेळ लागणार नाही.