Gold Old Bill: भारतीय लोकांना सोन्याची प्रचंड आवड आहे. घराघरात भारतीय महिलांकडे सोन्याचे अनेक दागिने आहेत. भारतीयांचे सोन्यासंदर्भात असलेले हे प्रेम पुरातनकाळापासून आहे. त्यामुळे जगात सर्वाधिक सोन्याची विक्री भारतात होते. आता सोन्याचे दर ७० हजार रुपये तोळ्यापलीकडे गेले आहेत. त्यानंतर सराफ बाजारात सोने खरेदीसाठी प्रचंड गर्दी असते. या पार्श्वभूमीवर १९६० च्या दशकातील सोन्याची एक पावती सोशल मीडियावर व्हायरल झाली. पुण्यातील सोने व्यापाऱ्याकडून ग्राहकाने ११.१६ ग्रॅम सोने घेतले होते. त्यासाठी केवळ ११३ रुपये मोजले होते. आजची परिस्थिती पहिल्यास तितके सोने घेण्यास ८० हजारांपेक्षा जास्त रक्कम लागणार आहे. यामुळे ही पावती व्हायरल झाली असून त्यावर अनेक कॉमेंट येत आहेत.
सोशल मीडियावर zindagi.gulzar.h या खात्यावरुन सोने खरेदीचे एक बिल व्हायरल झाले आहे. त्या बिलात ११.१६ ग्रॅम सोने ११३ रुपयांना होते. ही सोन्याची पावती पुणे येथील सराफाची आहे. वामन निंबाजी अष्टेकर यांच्या दुकानातून सोने खरेदी केले आहे. ३ मार्च १९५९ खरेदी केलेले हे सोने आणि चांदी ग्राहकाला १०९ रुपयांना मिळाले आहे. शिवलिंग आत्माराम या व्यक्तीने हे सोने घेतले आहे. सोन्यासोबत त्या व्यक्तीने चांदीही घेतली आहे. ती केवळ १२ रुपयांना आली आहे.
‘जिंदगी गुलजार है’ नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर हे बिल शेअर करण्यात आले आहे. त्याला मजेशीर कमेंट मिळत आहे. अनेकांनी या पोस्टला लाईक केले आहे. ७९ हजारांपेक्षा जास्त लाइक्स या पोस्टला मिळाल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, त्यावेळी ११३ रुपयांचे मूल्य आजच्या ८० हजारांसारखे आहे. दुसरा म्हणतो ११३ रुपये कमवण्यासाठी तीन महिने त्या काळात लागत होते. आणखी एक जण म्हणतो, त्याकाळात पाच आणि दहा रुपये पगार होता.
एक युजरने म्हटले. १९५९ मधील किंमत आणि आजची सोन्याची किंमत पाहिल्यास त्यात ५० हजार पट वाढ झाली. त्यामुळे सोने खरेदी नेहमी फायदेशीर आहे. सोन्यातील गुंतवणूक चांगली असल्याचे जुने लोक म्हणत होते, ते सत्य आहे.