आपल्या देशात अजूनही जुनी संस्कृती, परंपरा जपली जाते. अनेक जातसमूह, अनेक गावांनी या संस्कृतीचं जतन केलं आहे. राजस्थानात तर पोषाखापासून ते ऐतिहासिक किल्ल्यांचं जतन करून ठेवण्यात आलं आहे. त्यामुळेच राजस्थान पर्यटनासाठी पर्यटकांची पहिली पसंत असते. उन्हाळ्यात या राज्यात प्रचंड ऊन असतं. तर हिवाळ्यात जीवघेणा हिवाळा असतो. पण तरीही पर्यटक हिवाळ्यातच राजस्थानात फिरायला जाणं पसंत करतात. विदेशी पर्यटकही राजस्थानात राजे महाराजांचे किल्ले आणि राजवाडे पाहायला येतात. राजस्थानातील एक गाव तर प्रचंड सुंदर आहे. त्यामुळे या गावाला भेट दिल्याशिवाय पर्यटक पुढे जात नाही.
राजस्थानच्या आमेर किल्ल्यापासून ते कुंभलगडापर्यंत अनेक महत्त्वाची ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. पण राजस्थानात असंही एक गाव आहे, जे आपली खासियत जपून आहे. या गावाला भारतातील सर्वश्रेष्ठ पर्यटक गाव म्हणूनही घोषित करण्यात आलं आहे. जर तुम्हाला राजस्थानला फिरायला जायचं असेल तर तुमच्या फिरण्याच्या यादीत या गावाचा जरूर समावेश करा. या गावात गेल्यावर तुम्हाला निर्णय चुकला असं कधीच वाटणार नाही.
राजस्थानला फिरायला गेला तर ब्यावर जिल्ह्यातील देवमाली गावाला जरूर जा. या गावातील प्रत्येक घर मातीचं आहे. घराचं छप्पर उडालेलं आहे. गावात एकही घर तुम्हाला पक्कं दिसणार नाही. प्राचीन काळातील घरांसारखी ही घरे आहेत. त्यामुळे या गावात गेल्यावर आपण जुन्या काळात तर नाही ना आलोय, असा भास होतो. या गावात फक्त मंदिर आणि सरकारी कार्यालये पक्की बांधलेली आहेत. पण घरे मात्र अजूनही कच्चीच आहेत. विशेष म्हणजे या गावात कोणीच मांसाहार करत नाही. सर्वच शाकाहारी आहेत. तसेच या गावात कोणीही दारू पित नाही. या गावात आजवर कधीच चोरी झाली नसल्याचं सांगितलं जातं.
या गावातील तीन हजार एकर जमीन भगवान नारायणाला समर्पित आहे. या गावातील लोक आपली संस्कृतीशी घट्ट जुळलेले आहेत. आपल्या परंपरांचं पालन करतात. या गावातील लोक जुन्या संस्कृती सोबतच पर्यावरणाचंही संरक्षण करतात. या गावात रॉकेल आणि लिंबाचं लाकूड जाळण्यासही मनाई असल्याचं सांगितलं जातं.
जर तुम्ही देवमाली गावात आला तर भगवान देवनारायण मंदिराला भेट द्याच. डोंगरावर वसलेलं हे मंदिर आहे. भगवान देवनारायण यांच्या नावावरच या गावाचं नाव देवमाली ठेवल्याचं सांगितलं जातं. या गावात गेल्यावर जुन्या काळात आल्यासारखा फिल येतो. अत्यंत शांत, कोणताही धावपळ नसलेलं, आधुनिक जगाचं अवडंबर नसलेलं हे गाव आहे. म्हणूनच पर्यटक या गावाला आवर्जून भेट देतात. जुन्या जमान्यात आल्याचा आनंद घेतात.