अयोध्या : 19 जानेवारी 2024 | येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार आहे. त्यासाठी विविध पूजा आणि विधी सुरू झाल्या आहेत. मुख्य सोहळा मात्र 22 जानेवारी रोजीच पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास तसंच बिझनेस, क्रीडा आणि मनोरंजन यांसह विविध क्षेत्रातील 7000 मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील हॉटेल रुम्सच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. देशभरातील तब्बल 3 ते 5 लाख भक्त अयोध्येत दाखल होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अयोध्येतील हॉटेल्सची बुकिंग आधीपासूनच फुल झाली आहे. ज्या हॉटेलमध्ये रुम्स उपलब्ध आहेत, त्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये अयोध्येतील हॉटेल रुम्सच्या किंमती किती वाढल्या आहेत, त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. एका रात्रीसाठी तब्बल एक लाख रुपयांपर्यंत ही किंमत पोहोचली आहे. ऑनलाइन साइट्सवर रुम्स उपलब्ध नसल्याचं दाखवण्यात येत आहेत. तर सरासरीपेक्षा पाच पटीने जास्त भाडं वाढल्याचं म्हटलं गेलंय. अयोध्येतील ‘द पार्क इन रॅडिसन’ या हॉटेल रुमची किंमत एक लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे, असंही या व्हिडीओत म्हटलं गेलं आहे.
अयोध्येतील रामायण हॉटेलचे कर्मचारी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “जानेवारी 20 ते 25 या तारखांदरम्यान हॉटेलचे सर्व रुम्स बुक झाले आहेत. त्यानंतरच्या पुढील महिन्यांसाठीही बऱ्यापैकी बुकिंग झाली आहे.” तर दुसरीकडे ‘पार्क इन हॉटेल’मध्ये डिसेंबरच्या मध्यापासूनच बुकिंग फुल झाली होती. येत्या 23 जानेवारीपर्यंत कोणतीही बुकिंग उपलब्ध नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अयोध्येत हॉटेल रुम्सची वाढती मागणी पाहता प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतरही एका रात्रीसाठीची किंमत 30 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
राम मंदिरापासून सहा किलोमीटरवर असलेल्या ‘सिग्नेट कलेक्शन हॉटेल्स’च्या रुमच्या किंमती या 7 हजार रुपयांपासून 25 हजार रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. या किंमती फक्त एका रात्रीच्या आहेत. भक्तांना राहण्याची व्यवस्था करता यावी यासाठी काही नवीन होमस्टे सुद्धा सुरु झाल्या आहेत.