लोणावळा | 24 जुलै 2023 : गेल्या आठवड्याभरापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सर्वत्र वातावणात चांगले झाले आहे. धबधबे प्रवाहित झाले आहेत. यामुळे पर्यटनस्थळी पर्यटकांची चांगलीच गर्दी होऊ लागली आहे. डोंगर, दऱ्यांवर पोहचलेले युवक, युवती सेल्फीसाठी नको ते धाडस करत आहेत. प्रसिद्ध अशा अजिंठा लेणीमध्ये असाच प्रकार युवकाला चांगलाच महागात पडला. यामुळे तो ७० फूट खाली दरीत पडला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सोयगाव येथील गोपाळ पुंडलिक चव्हाण (३०) हा मित्रांसह अजिंठा लेणी पाहण्यासाठी आला. यावेळी सेल्फीसाठी तो सातकुंडाच्या धबधब्याजवळ गेला. धबधब्याच्या टोकला जाऊन पोहचला. त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो ७० फूट खाली कोसळला. या घटनेनंतर लागलीच त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी धावाधाव सुरु केली. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी धाव घेतली.
A incident in the #AjantaCaves area. While taking a selfie pic.twitter.com/S87xDMRIx3
— jitendra (@jitendrazavar) July 24, 2023
गोपाल चव्हाण वरतून खाली पाण्यात पडला. खाली पाणी असल्यामुळे तो वाचला. त्याला पोहता येत होते. दरम्यान अजिंठा लेणीवर असलेल्या भारतीय पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी खाली दोर सोडला. मग तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर तो सुखरुप बाहेर आला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात दोरच्या साह्याने तो लटकलेला दिसत आहे. या घटनेनंतर पर्यंटकांनी सावधगिरी बाळगली गेली पाहिजे, अती धाडस करायला नको, अशा कॉमेंट व्यक्त केल्या जात आहेत. तसेच गर्दी होणाऱ्या ठिकाणी बंदोबस्त ठेवला गेला पाहिजे, अशी अपेक्षा सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. या ठिकाणी कठडे बसवावेत, अशी मागणी केली जात आहेत.
दरम्यान अजिंठा लेणी परिसरात यापूर्वी अशी घटना घडली होती. २०२१ रोजी जळगाव येथील देवांशू मौर्य या ठिकाणी पडला होता. त्यावेळी त्यालाही सुखरूप बाहेर काढले होते.