मुंबई: भावा बहिणीचं नातं हे जगातलं सगळ्यात सुंदर नातं असतं. या नात्यात भांडण असतं, प्रेम असतं, रुसवा असतो फुगवा असतो बरंच काही असतं. रक्षाबंधनाच्या दिवशी असा एक दिवस मिळतो ज्यावेळी भाऊ बहिणीवर असणारं प्रेम व्यक्त करतो आणि बहीण भावावर असणारं प्रेम व्यक्त करते. इतर वेळी सुद्धा हे प्रेम असतंच पण हा दिवस खास प्रेम दाखवण्यासाठीच असतो. ज्यांना भाऊ आहे किंवा ज्यांना बहीण आहे त्यांना हे नक्कीच सहज शक्य आहे. रक्षाबंधनचा दिवस ते साजरा करतात. बहीण राखी बांधते, भाऊ गिफ्ट देतो. पण ज्या बहिणीचा भाऊ शहीद झालाय तिचं काय? तिने काय करावं? ती कुणाला राखी बांधेल? अशीच एक गोष्ट व्हायरल होतेय. काय आहे ती गोष्ट जाणून घेऊयात…
सीकर मधील रामपुरा गावातील एक बहीण आपल्या शहीद झालेल्या भावाच्या पुतळ्याला दरवर्षी न चुकता राखी बांधते. कमाल आहे ना? हे नातंच कमाल आहे. रामपुरा गावातील सुशीला, तिचा भाऊ शहीद सैनिक विनोद कुमार नागा हा कारगिल युद्धात शहीद झालाय. आजही सुशीला तिच्या भावाला जिवंत असल्याचं समजते आणि रक्षाबंधनच्या दिवशी गावात येऊन त्याच्या पुतळ्याला राखी बांधते, मिठी मारते. आहे ना अनोखी कहाणी?
शहीद विनोद कुमार नागा यांच्या पुतणीने सांगितलं, “माझे मोठे पप्पा (काका) जेव्हा जिवंत होते तेव्हा आत्या दरवर्षी न चुकता राखी बांधायला यायची. २४ वर्षांपूर्वी काका कारगिल युद्धात शहीद झाले. या नंतर आजसुद्धा आत्या रक्षाबंधनला मिठाई आणि राख्या घेऊन येते. काकांच्या पुतळ्याला राखी बांधते आणि मिठी मारते.” शहीद विनोद कुमार नागा यांची पत्नी सुद्धा हेच सांगते, “माझी नणंद दरवर्षी न चुकता येऊन नवऱ्याच्या पुतळ्याला राखी बांधते.”