मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील एक चहावाला हल्ली चर्चेत आला आहे. सिंगरौली जिल्ह्यातील राजमिलन येथील रहिवासी दिनेश शहा यांचं चहाचं दुकान आहे. या दुकानात चहाची नावं वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने ठेवण्यात आलीयेत. ही नावं इतकी हटके आहेत की काही दिवसांतच या दुकानात रोज 2 हजार ते 5 हजारांपर्यंत चहाची विक्री सुरू झाली.
दिनेश शहा यांचं दुकान राजमिलन गावात आहे. टपरीच्या नावाने हे चहाचे दुकान आहे. या चहाच्या दुकानात चहाच्या दरातही सवलत आहे, पण ती फक्त प्रेमात धोका मिळालेल्यांसाठीच. होय! ज्यांनी प्रेमात धोका खाल्लाय फक्त त्याच लोकांसाठी इथे सवलत आहे.
त्यांच्यासाठी खास 10 रुपयांत चहा मिळतो. त्याचबरोबर प्रेमी युगुलांना 15 रुपयांत चहा मिळतो. याशिवाय सर्वसामान्यांसाठीही स्वतंत्र दर निश्चित करण्यात आला आहे.
थोडक्यात काय तर इथे इतर लोकांसाठी 20 रुपयात चहा, प्रेमी युगुलांसाठी 15 रुपयात चहा आणि प्रेमात धोका मिळालेल्यांसाठी 10 रुपयात चहा आहे. चहावाल्याची ही अनोखी स्टाईल सर्वांनाच पसंत पडलीये, लोकही चहा पिण्यासाठी इथे लांबून लांबून येत आहेत.
संध्याकाळी दुकानात बरीच गर्दी जमा होत आहे. संध्याकाळ होताच या दुकानात प्रियकर-प्रेयसी आणि विवाहित जोडपी चहाचा आस्वाद घेण्यासाठी येतात.