मुंबई | 13 सप्टेंबर 2023 : विमानप्रवास म्हटला की आपल्या मराठी माणसाला थोडं परक्यासारखंच वाटायला लागतं…विमानतळाच्या सुरक्षेपासून ते विमानाच्या आत सर्वत्र इंग्रजी भाषेच्या वापराने पहिल्यांदा प्रवास करणारे थोडं अवघडलेलेच असतात. विमान प्रवासाचा अनुभव प्रत्येकाला आलेला असतो. साध्या एअर होस्टेसला बोलावण्यापासून ते तिच्या सूचना ऐकण्यापर्यंत इंग्रजी भाषेचा अवडंबर पाहून पहिल्यांदा प्रवास करणारे दचकूनच असतात. अशात स्पाईस जेट एअरलाईन्सच्या ( Spice jet flights ) पुणे ते गोवा प्रवास करणाऱ्या विमानातील प्रवाशांना एक सुखद धक्का बसला. या विमानातील सह विमान चालिका संजना अमृते हिने इंग्रजी भाषेऐवजी चक्क मराठीतून उद्घोषणा केली. या उद्घोषणेचा शेवट संजना अमृते हीने ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ असा केल्याने विमान प्रवाशांची मने तिने अक्षरश: जिंकली.
विमानाची सेवा डोमेस्टीक असो की इंटरनॅशनल विमानात नेहमी इंग्रजीतून उद्घोषणा केली जात असते. मात्र आपल्या पुण्यातून गोव्याला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानातील सहविमान चालिका संजना अमृते हिने आधी प्रवाशांच्या स्वागताची सुरुवात इंग्रजीत केली. परंतू नंतर तिने मराठीतून स्वत:ची आणि मुख्य पायलटची ओळख करुन दिली. त्यानंतर पुणे ते गोवा हे अंतर आपण 47 मिनिटांत कापणार आहोत. आपण 29000 फूट उंचीवरुन उडत आहोत. नऊ किलोमीटरचे हे अंतर असल्याचे तिने प्रवाशांना सांगितले. आपले मुख्य पायलट एक चांगले कवी आहेत. त्यांना तुम्ही नक्की फॉलो करा अशी विनंतीही तिने केली आणि शेवटी आभार मानताना तिने जय हिंद जय महाराष्ट्र असा समारोप करीत सुखद प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. तिच्या या मराठीतून उद्घोषणेचे स्वागत प्रवाशांनी टाळ्या वाजवित केल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.
संजना अमृते हीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे –
स्पाईस जेट #SpiceJet विमानाची सह विमानचालिका संजना अमृते यांनी पुणे ते गोवा यात्रेदरम्यान केली मराठीत उद्घोषणा 🗣️
महाराष्ट्रातुन उडणाऱ्या व इथे येणाऱ्या सर्व विमानात प्रथम #मराठीत उद्घोषणा झाल्या पाहिजेत.@JM_Scindia@AAI_Official
राज्य मराठी ! भाषा मराठीखूप आभार @flyspicejet pic.twitter.com/IP5w2GfAPK
— मराठी एकीकरण समिती – Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) September 12, 2023
या संदर्भातील ट्वीटरवर ( एक्सवर ) व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मराठी एकीकरण समितीने हा व्हिडीओ शेअर करीत स्पाईस जेटच्या विमानाची सह विमानचालिका संजना अमृते हीचे कौतूक केले आहे. महाराष्ट्रातून उडणाऱ्या आणि इथे येणाऱ्या सर्व विमानात प्रथम मराठीत उद्घोषणार झाल्या पाहीजेत अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे. या पोस्टला युजरनी चांगला प्रतिसाद दिला आहे. एका युजरने ही सह विमान चालिका गिरगावच्या चिकीत्सक हायस्कुलची विद्यार्थीनी असल्याचे म्हटले आहे. तर एका युजरने या सुसंस्कृत महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.