मुंबई : 30 नोव्हेंबर 2023 | माजी क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम ओपनिंग बॅट्समन म्हणून ओळखले जाणारे सुनील गावस्कर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका रेल्वे स्थानकाचा फोटो पोस्ट केला. सध्या या फोटोची तुफान चर्चा होत आहे. कारण ज्या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर उभं राहून गावस्कर यांनी फोटो काढला आहे, त्याचं नाव सचिन असं आहे. त्यांच्या या फोटोवर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही कमेंट केली आहे. गावस्कर यांचा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी ‘सचिन’ या रेल्वे स्थानकाविषयी कुतूहल व्यक्त केलं. सचिन या रेल्वे स्थानकाचं नाव सचिन तेंडुलकरवरून देण्यात आलं आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
या फोटोमध्ये सुनील गावस्कर हे रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभे असल्याचं दिसत आहे. प्लॅटफॉर्मवर मोठ्या अक्षरात लिहिलेल्या ‘सचिन’ या नावाकडे ते बोट दाखवत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘गेल्या शतकातील लोकांची किती दूरदृष्टी होती. त्यांनी सुरतजवळच्या एका रेल्वे स्थानकाचं नाव क्रिकेटमधील सर्वांत महान खेळाडूंपैकी एकाचं दिलं आहे. तो माझा सर्वांत आवडता क्रिकेटर तर आहेच पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ती व्यक्ती माझी सर्वांत आवडती आहे.’ सुनील गावस्कर यांच्या या फोटोवर सचिननेही कमेंट केली. ‘गावस्कर सर, तुमचे हे शब्द माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. सचिन याठिकाणचं वातावरण खूप सुंदर असल्याचं पाहून मला आनंद झाला’, असं तेंडुलकरने लिहिलं.
या फोटोवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हे स्टेशन माझ्या गावापासून फक्त 20 किलोमीटर दूर आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुम्ही तिथे काय करत आहात? तिथे फक्त लोकल ट्रेन थांबतात, एक्स्प्रेस नाही. ते खूप छोटं स्टेशन आहे’, असं दुसऱ्याने गावस्कर यांना विचारलंय. आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय, ‘ते माझं गाव आहे आणि त्याचं नाव सचिन तेंडुलकरच्या नावावरून देण्यात आलेलं नाही.’
गुजरातमधील सुरतजवळ ‘सचिन’ या नावाने रेल्वे स्थानक आहे. पण या रेल्वे स्थानकाचं नाव सचिनवरून देण्यात आलेलं नाही. कारण सचिनच्या जन्माच्या खूप आधीपासून हे रेल्वे स्थानक त्या नावाने तिथे आहे. विशेष म्हणजे कोहली या नावानेही एक रेल्वे स्थानक आहे. महाराष्ट्रातील नागपुरातल्या एका रेल्वे स्थानकाचं नाव ‘कोहली’ असं आहे. हे नावसुद्धा विराट कोहलीच्या नावावरून देण्यात आलेलं नाही.