नवी दिल्ली | 20 डिसेंबर 2023 : कोण कधी काय करेल याची काही शाश्वती नाही. कुणाला कोणती गोष्ट आवडेल हेही सांगता येत नाही. खाणं आणि राहणीमान याच्याबाबतीत भारतीय लोक फार काटेकोर असतात. वेळोवेळी ते स्पष्टही होत असतं. स्विगी इन्स्टामार्ट क्विक कॉमर्स ट्रेंड्स 2023च्या अहवालातून ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. स्विगीच्या या रिपोर्टमध्ये भारतीयांनी स्विगी इन्स्टामार्टवरून सर्वाधिक काय मागवलं याची माहिती यात देण्यात आली आहे.
स्विगी इन्स्टामार्टवरून जे काही सांगितलं आहे, त्यावरून भारतीयांची रुची सर्वाधिक कशात आहे हे दिसून येत आहे. स्विगीने विक्रमी वेळा भारतीयांना घरापर्यंत कंडोमपासून ते मखानेपर्यंतची डिलिव्हरी केली आहे. स्विगी इन्स्टामार्टच्या या अहवालामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
स्विगी 15 ते 20 मिनिटात 28 शहरात लोकांना सामान उपलब्ध करून देत असते. त्यामुळे शहरी भागातील लोक स्विगीचा पुरेपूर वापर करतात. स्विगीच्या अहवालानुसार चेन्नईच्या एका व्यक्तीने 31 हजार 748 रुपयांची सर्वात मोठी ऑर्डर दिली होती. त्यात कॉफी, ज्यूस, कुकीज, नाचोस आणि चिप्सचा समावेश होता. या पदार्थांवर या व्यक्तीने 31 हजाराहून अधिक रक्कम मोजल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
त्यानंतर जयपूरच्या एका तरुणाने 67 ऑर्डर देऊन विक्रम बनवला आहे. तर दिल्लीच्या एका दुकानदाराने त्याच्या 12,87,920 रुपये वार्षिक किराना खर्चावर 1,70,102 रुपयांची बचत केलीय. या अहवालात सप्टेंबर महिन्याची तुलना व्हॅलेंटाईन महिन्याशी करण्यात आली आहे. कारण फेब्रुवारीत नव्हे तर सप्टेंबरमध्ये कंडोमची सर्वाधिक विक्री झाली आहे. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक विक्री झाल्याने आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे. 12 ऑगस्ट रोजी सर्वाधिक 5893 कंडोमची विक्री झाली. त्याशिवाय कांदा, केळी, चिप्स, पेंटिंगचीही मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिली गेली. विशेष दखल घेण्यासारखी बाब म्हणजे यंदा लोक आरोग्याबाबत अधिक सजग असल्याचं दिसून आलं आहे.
स्विगीला वर्षभरात मखान्याच्या 1.3 मिलियन ऑर्डर आल्या. यावरून लोकांनी स्नॅक्स म्हणून मखानाला सर्वाधिक पसंती दिल्याचं दिसून येत आहे. फळांमध्ये आंब्याचाच सर्वाधिक दबदबा राहिला आहे. खासकरून बेंगळुरूत स्विगीकडून घेतलेले सर्वाधिक आंबे खाल्ले गेले. आंबे खाण्याच्या बाबतीत बेंगळुरूच्या लोकांनी मुंबई आणि हैदराबादच्या लोकांनीही मागे टाकले. 21 मे रोजी देशभरात 36 टन आंब्याची डिलिव्हरी झाली आहे.