हैदराबाद : सर्वसामान्यपणे वर आणि वधू या दोघांचं लग्न होतं. मात्र एकाच मांडवात तुम्ही एक वर आणि दोन वधू कधी पाहिलेत का? तेलंगणच्या भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात असं लग्न पार पडलं. ज्यात नवरदेवाने एकाचवेळी दोन मुलींसोबत लग्न केलं. महत्त्वाच म्हणजे या लग्नाला दोन्ही मुलींचे पालक उपस्थित होते. चेर्ला मंडलातील एराबोरू गावात रहाणाऱ्या मादिवी सतीबाबूने सुनिता आणि स्वप्ना या दोन मुलींसोबत लग्न केलं. दोघींसोबत विवाहाचे सर्व विधी पार पाडले. या विवाहाची लग्न पत्रिका आधीच वाटण्यात आली होती. त्यावर दोन्ही वधूंची आणि त्याच्या पालकांच्या नावाचा उल्लेख होता.
दोघी लग्नासाठी कशा काय तयार झाल्या?
एकच मुलगा दोघींसोबत कसं काय लग्न करतो? त्या दोघी लग्नासाठी कशा काय तयार झाल्या? महत्त्वाचं म्हणजे दोन्ही मुलींचे आई-वडिल कसे ऐकले? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील. तुम्हाला वाटत असेल, हे सर्व सहजतेने घडलं, पण असं नाहीय. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
दोघींसोबत लग्न करण्याच जाहीर केलं
“मादिवी सतीबाबूच पहिलं प्रेम स्वप्ना होती. पण सतीबाबूने दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यावर स्वप्नाने आक्षेप घेतला. अखेर सतीबाबूने दोघींसोबत लग्न करण्याच जाहीर केल्यानंतर वाद निवळला. स्वप्ना अशा पद्धतीच्या लग्नाला तयार झाली. दोन्ही मुलींच्या पालकांनी सुद्धा कुठलाही आक्षेप घेतला नाही, त्यांनी सुद्धा आपल्या बाजूने होकार दिला व हे लग्न पार पडलं” एका स्थानिक गावकऱ्याने ही माहिती दिली.
सुनिताच्या प्रेमात पडला
सतीबाबू आणि स्वप्ना दोघे विद्यार्थी दशेपासून प्रेमात होते. दोघे लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यातून स्वप्नाने एका मुलीला जन्म दिला. स्वप्ना चेर्ला मंडलातील दोषापल्ली गावात रहायची. स्वप्नासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना सतीबाबू त्याच्या नात्यात असलेल्या सुनिताच्या प्रेमात पडला. तिने सुद्धा एका गोंडस मुलाला जन्म दिला.
सतीबाबू दोन मुलांचा बाप बनला
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना सतीबाबू दोन मुलांचा बाप बनला. त्यावेळी सतीबाबूला दोन्ही मुलींच्या पालकांनी लग्न कधी करणार? म्हणून प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावेळी सतीबाबूने दोघींसोबत लग्न करण्याचा पर्याय सुचवला. सतीबाबू ज्या समाजाशी संबंधित आहे, तिथे एका पुरुषाने दोन मुलींसोबत लग्न करणं सामान्यबाब आहे. अखेर सर्वांच्या समतीने हे लग्न पार पडलं.