कोंबडी आधी की अंडे ? हा प्रश्न जुना झाला, आता कोंबडी पक्षी आहे की प्राणी ?

| Updated on: Mar 31, 2023 | 5:42 PM

पोल्ट्री आणि चिकनच्या दुकानदारांकडून स्वच्छता राखण्याच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने गुजरात हायकोर्टाने मटण आणि पोल्ट्रीच्या दुकानांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

कोंबडी आधी की अंडे ? हा प्रश्न जुना झाला, आता कोंबडी पक्षी आहे की प्राणी ?
HEN
Image Credit source: socialmedia
Follow us on

अहमदाबाद :  कोंबडी आधी का अंडे आधी हा प्रश्न अनेकदा चर्चेत येत असतो. या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी जितका मेंदूला ताण द्यावा लागतो. त्यापेक्षा आता नवीन गहन प्रश्न कोंबड्यांच्या अस्तित्वाविषयी निर्माण झाला आहे. कोंबडी हा प्राणी आहे की पक्षी ? असा मोठा गहन प्रश्न गुजरातच्या हायकोर्टासमोर निर्माण झाला आहे. आता तुम्ही गोंधळला असाल तर माहिती करून घेऊयात नेमकी भानगड काय झाली आहे ते…

गुजरात उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेवर सुनावली झाली आहे. या याचिकेत मटणाच्या दुकानात कोंबडी कापण्याला आक्षेप घेण्यात आला आहे. या याचिकेत म्हटले आहे की कत्तलखान्यांच्या ऐवजी जर चिकनच्या दुकानात कोंबड्या कापल्या जात असतील तर ते गैर आहे. या याचिकेमुळे चिकन व्यावसायिक आणि पोल्ट्री फार्मवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. पोल्ट्री व्यावसायिक आणि चिकन विक्री करणाऱ्या दुकानदारांना आशा आहे की हायकोर्ट त्यांची बाजू ऐकून त्यांच्या दुकानांना उघडण्याची परवानगी देईल.

गुजरात हायकोर्टाने मटण आणि पोल्ट्रीच्या दुकानांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पोल्ट्री आणि चिकनच्या दुकानांदारांकडून स्वच्छता राखण्याच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने हा निर्णय हायकोर्टाने घेतला आहे.

कोंबडी हा प्राणी आहे की पक्षी ?

गुजरातच्या हायकोर्टाच्या आदेशामुळे पालिकेने मटणाची दुकाने बंद केली होती. जनावरांना कत्तलखान्यात मारण्याऐवजी त्यांना दुकानातच स्वच्छतेचे सारे निकष पायदळी तुडवत मारल्याने सूरत महापालिकेने या दुकानांवर बंदी घातली आहे. गुजरात हायकोर्टात एनिमल वेल्फेअर फाऊंडेशन आणि अहिंसा महासंघाच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत जनावरांच्या कत्तली संदर्भात सुप्रिम कोर्टाचे विविध कायदे आणि निर्देशांना लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हायकोर्टाने स्वच्छता राखण्याविषयी आदेश जारी केले होते. या याचिकांवर सुनावणी घेतना आता हायकोर्टासमोर कोंबडी किंवा कोंबडा हा पक्षी आहे का प्राणी ? असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. कारण त्यावर त्यांना कापण्याची परवानगी नेमकी कुठे द्यायची याचा निर्णय होणार आहे.

पोल्ट्री ट्रेडर्स हायकोर्टात पोहचले

चिकनची दुकाने बंद करण्याच्या आदेशाविरोधात पोल्ट्री ट्रेंडर्स एण्ड चिकन शॉप ओनर्स देखील आता गुजरात हायकोर्टात दाखल झाले आहेत. हायकोर्टाच्या आदेशामुळे त्यांच्या उपजिविकेचा सवाल निर्माण झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी कोंबड्यांना कत्तलखान्यात नेऊन कापणे हे व्यवहारीक नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपली बंद केलेली दुकाने उघडण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा आता हायकोर्टाच्या निकालाकडे लागल्या आहेत. जर दुकानात चिकन कापण्याची परवानगी मिळाली नाही तर चिकन दुकानदारांना   कत्तलखान्याचा पर्याय शिलल्क आहे.