मध्य प्रदेशातून वीज बिलाच्या वसुलीचा अनोखा प्रकार समोर आला आहे. इथे वीज बिल भरले नाही तर वीज कंपनी लोकांच्या घरातून टीव्ही, फ्रीजसारख्या खासगी वस्तू उचलतेय. जेव्हा ग्राहक वेळेवर वीज बिल भरत नाही, तेव्हा त्याला दंड आकारला जातो किंवा त्यांचे वीज कनेक्शन तोडले जाते. पण एमपीमधील वीज कंपनीने ग्राहकांकडून बिल वसुलीसाठी अवलंबलेली अजब पद्धत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीये.
आज तकच्या वृत्तानुसार, हे प्रकरण मध्य प्रदेशातील उज्जैन येथील आहे. जिथे एका वीज कंपनीने बिल गोळा करण्यासाठी लोकांच्या घरातील वैयक्तिक सामान उचलण्यास सुरुवात केली.
वीज कंपनीने 20 नोव्हेंबर रोजी उज्जैनमधील काही घरांमधून फ्रीज, टीव्ही, कुलर, हीटर आणि इतर वस्तू जप्त केल्याचा दावा करण्यात आला होता. जप्त केलेल्या सामानातून मिळालेल्या रकमेतून बिलाची भरपाई केली जाईल.
या वीज कंपनीशी संबंधित राजेश हारोड यांनी सांगितले की, इथले लोक वर्षभरापासून विजेचा वापर करत आहेत.
पण बिलं भरताना त्याकडे दुर्लक्ष करतात, बिल भरत नाहीत.
अशा परिस्थितीत अनेकांचे 40 हजार रुपयांपेक्षा जास्त बिल 90 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. याबाबत कंपनीने लोकांच्या घरचा माल जप्त करण्यास सुरुवात केली आहे.
ज्या घरांतून माल जप्त करण्यात आला आहे, तिथे दोन-तीन वर्षांपासून वीज बिल जमा झालेले नाही. सुमारे 200 लोकांकडे वीज कंपनीचे 1.70 कोटी रुपयांचे कर्ज आहे. या लोकांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, त्यापैकी 70 जणांनी वीज बिल जमा केलं आहे. उरलेल्यांनी गांभीर्याने न घेतल्यामुळे असं कठोर पाऊल उचलण्यात आलं.