मुंबई : 26 डिसेंबर 2023 | धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही देशातील अत्यंत प्रतिष्ठित आणि महागडी शाळा आहे. नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमामुळे ही शाळा सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. कारण या वार्षिक कार्यक्रमाला बॉलिवूडमधील मोठमोठे सेलिब्रिटी सहभागी झाले होते. अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय यांची मुलगी आराध्यापासून ते शाहरुख खानचा मुलगा अबरामपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं या शाळेत शिकत आहेत. तर काहींनी या शाळेत शिक्षण पूर्ण केलं आहे. फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर आएएस अधिकारी, प्रतिष्ठित व्यावसायिक यांचीही मुलं अंबानीच्या शाळेत शिकतात. अंबानींच्या शाळेतील कार्यक्रमाचे व्हिडीओ पाहिल्यानंतर या शाळेची फी किती असेल, तिथे शिकवणाऱ्या शिक्षकांना पगार किती असेल याबद्दल जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.
धीरुभाई अंबानींच्या शाळेतील प्रत्येक गोष्ट अत्यंत खास आहे. या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा गणवेशसुद्धा देशातल्या सर्वांत प्रसिद्ध फॅशन डिझायनरने डिझाइन केला आहे. हा डिझायनर दुसरा तिसरा कोणी नसून मनिष मल्होत्रा आहे. तर शाळेतल्या कँटीनचा मेन्यू शेफ संजीव कपूरने खास तयार केला आहे. नीता अंबानी यांनी 2003 मध्ये या शाळेची स्थापना केली. देशातल्या अनेक नामवंत आणि मोठ्या व्यक्तींच्या योगदानामुळे ही शाळा आता चर्चेत आली आहे. या शाळेतील प्रत्येक गोष्ट अत्यंत बारकाईने ठरवली गेली आहे. अंबानींच्या शाळेचं गीत जावेद अख्तर यांनी लिहिलं असून शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाने ते संगीतबद्ध केलंय.
धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही तब्बल एक लाख 30 हजार चौरस फुटांवर पसरली असून शाळेची इमारत सात मजली आहे. या शाळेत आराध्या बच्चन, अबराम खान, करण जोहरची दोन्ही मुलं यश आणि रुही, शाहीद कपूरची मुलं, करीना कपूरचा मुलगा तैमुर हे सर्वजण याच शाळेत शिक्षण घेत आहेत.