वॉशिंग्टन | 15 सप्टेंबर 2023 : सध्या जगभरात एकच विषय अधिक चर्चेत आहे. तो म्हणजे एलियन्सचा. काही दिवसांपूर्वीच मेक्सिकोच्या संसदेत कथित एलियन्सचे मृतदेह दाखवून जगाला चक्रावून सोडलं. हे एलियन्स साईजने खूप छोटे दिसत होते. पण त्यांचे डोळे मोठे, बटबटीत आणि रहस्यमयी वाटत होते. त्याशिवाय त्यांचं डोकं शरीराच्या तुलनेत मोठं होतं. त्यांच्या हाताला फक्त तीनच बोटे होती. एलियन्सची ही चर्चा थांबत नाही तोच आता आणखी एका प्रकाराने चर्चा रंगली आहे. अमेरिकेतील लासवेगासमधील एका कुटुंबाने एलियन्सला पाहिल्याचा दावा केला आहे. त्यांनी या एलियन्सचं वर्णनही केलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यामुळे एलियन्स खरोखरच पृथ्वीवर आलेत का? अशी चर्चा रंगली आहे.
डेली मेलने ही बातमी दिली आहे. या कुटुंबातील चार लोक आहेत. त्यांनी त्यांच्या घराच्यामागे एलियन्स पाहिल्याचा दावा केला आहे. एलियन्स कसे दिसतात याची माहितीही त्यांनी दिलीय. आम्ही आमच्या घरात चित्रविचित्र जीव पाहिले. ते भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत होते. मानवापेक्षा ते अधिक उंच होते. साधारणपणे मनुष्याची उंची 7 ते 8 फूट असते. पण या कुटुंबाच्या दाव्यानुसार त्यांनी पाहिलेले एलियन्स 10 फूट उंच होते. त्यांचे दात आणि कान चमकत होते. त्यांना नाकच नाहीये असं वाटत होते. बिना नाकाचे ते दिसत होते. त्यांचा रंगही हिरवा होता, असं या कुटुंबाचं म्हणणं आहे.
लोकांनी आपली टवाळी करू नये म्हणून आम्ही बरेच दिवस चूप राहिलो, असंही या कुटुंबाचं म्हणणं आहे. 911 नंबरवर फोन करून त्यांनी या प्रकाराची माहिती दिली. दोन महाकाय एलियन्स एका यूएफओमधून आमच्या घराच्या मागे उतरले, असं या कुटुंबाचं म्हणणं आहे. आम्ही जेव्हापासून या घटनेची माहिती दिली. तेव्हापासून आमच्या घरी असंख्य लोक येत आहे. रोज गर्दी होत आहे. एलियन्स कुठे उतरले होते ती जागा पाहत आहेत, असं या कुटुंबातील थोरला मुलगा एंजल याने सांगितलं. आम्हाला प्रचार करायचा नाही. प्रसिद्धी मिळवायची नाही. आम्ही फक्त पोलिसांना या घटनेची माहिती दिली, असं त्याने म्हटलंय.
लोकांना ही घटना खरी वाटत आहे. कारण हे सर्व कॅमेऱ्यात कैद झालं आहे. एंजलच्या शेजाऱ्याच्या घरातील कॅमेऱ्यात एका जोरदार आवाजासह प्रचंड धमाका झाल्याचं कैद झालं आहे. यूएफओची ही क्रॅश लँडिंग असल्याचं सांगितलं जात आहे. पण ही घटना किती खरी आहे, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. मात्र, या घटनेने जगभरातील लोक हैराण आहेत.