मुंबई: शाळेची एक वेगळी मजा होती. शाळेत कुठल्या बाबतीतलं ओझं नसायचं. मस्त शाळेत जायचं, तासांना बसायचं, डब्बा खायचा, घरी येऊन थोडा अभ्यास करायचा आणि झोपून जायचं. शाळेतल्या आठवणी या कधीही न विसरता येण्यासारख्या आठवणी आहेत. सगळं एका बाजूला आणि शाळेतील भांडणं एका बाजूला. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना शाळेतील भांडणं अजूनही लक्षात असतील. समजा शाळेत भांडण झाल्यावर तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी ते भांडण इंग्लिश मध्ये सांग असं म्हटलं असतं तर? किती अवघड झालं असतं ना? बरं जर तुम्ही इंग्लिश मिडीयम मध्ये असता तर ठीक. तुम्हाला ते सोपं गेलं असतं. पण जर तुम्ही तुमच्या मातृभाषेतच शिक्षण घेत असता तर? बापरे, विचार सुद्धा करवत नाही ना?
असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होतोय. शाळेतील दोन विद्यार्थी आपल्या शिक्षकापुढे उभे आहेत. त्यांनी एकमेकांमध्ये जबरदस्त भांडण केलंय त्यामुळे ते त्या शिक्षकांपुढे उभे असल्याचं दिसून येतंय. विद्यार्थ्यांचे शिक्षक त्यांना भांडण कसं झालं? हे इंग्लिशमध्ये सांगा असं म्हणतात. यावर मुले अक्षरशः इतकी मेहनत घेतात की बस्स. आता आपल्या सरांना आपण हे कसं सांगावं हा प्रश्न या मुलांना पडतो. काही इंग्लिश शब्द तर काही हावभाव करून कसंबसं ते त्या शिक्षकाला भांडण कसं झालं ते समजावून सांगतात. हा व्हिडीओ बघताना तुमचं हसूच थांबणार नाही.
याने माझा कसा गळा दाबला, कसा मला मुक्का मारला, इथे मारलं तिथे मारलं. मग मी कसं स्वतःला यातून सोडवून घेतलं. कुणी किती जोरात मारलं हे सगळं ही मुले त्या शिक्षकाला तोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये सांगतायत. व्हिडीओ बघताना लोकांना मात्र मजा वाटते. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. तुम्हाला सुद्धा हा व्हिडीओ बघताना आपल्या शाळेचे दिवस आठवतील.