आझमगड: दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण होणं ही भारतात तरी खूपच कॉमन गोष्ट आहे. कुठल्या ना कुठल्या कारणावरून इथे भांडण होत राहतात. कधी पाण्यावरून, कधी भिंतीवरून तर कधी आणखी कशावरून. जेव्हा शेजाऱ्यांमध्ये भांडण होते, तेव्हा दोघेही कशासाठी लढू शकतात याची कल्पना नसते. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये घडला, जेव्हा अंडरवेअरवरून दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण झाले. त्यात भांडण इतकं पुढे गेलं की मारामाऱ्या झाल्या. या हल्ल्यात 8 जण जखमी झाले असून सर्वांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यात घडली आहे, हा सगळा प्रकार येथील कटरा भागात घडला आहे. सुरेंद्र आणि गुड्डू अशी या दोन शेजाऱ्यांची नावे सांगितली जात असून दोघांमध्ये जुना वाद आहे. यावेळी अंडरवेअरचा किरकोळ वाद इतका वाढला की दोघांनी मारामाऱ्या केल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, गुड्डूने सुरेंद्र आणि त्याच्या पत्नीवर काठ्यांनी हल्ला केला. पीडितेचा आरोप आहे की गुड्डू हा गुंडगिरी करतो. तो जुन्या वादावरून भांडण आणि मारहाण करत राहतो. यावेळी अंडरवेअर वाळविण्यावरून वाद निर्माण झालाय. घराशेजारील अंडरवेअर वाळवण्यास त्यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला आणि मग गुड्डू कडून सुरेंद्रला धमकावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर या दोन्ही कुटुंबाचं भांडण झालं, हे भांडण इतकं वाढलं की काठ्या आणि विटांनी मारहाण झाली, ज्यात दाम्पत्य जखमी झाले. याशिवाय अन्य लोकही जखमी झाले आहेत.
याशिवाय मारहाणीची तक्रार आल्यानंतरही पोलिसांनी आरोपींवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सध्या जखमी लोकं हॉस्पिटल मध्ये उपचार घेतायत. पीडितेच्या कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.