कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वास असतो. जर तुमच्या जोडीदारावर विश्वास नसेल तर मग नात्याचा खेळखंडोबा झाल्याशिवाय राहत नाहीत. त्यातून जगासाठी मजेदार किस्से तर घडतात. पण नात्याची वीण तुटते, सैल होते. मन दुभंगतात. कानपूर जवळील बिठूर येथील एका पतीने असाच एक प्रकार केला. त्यामुळे त्याच्या आयुष्यात भूकंप आला. पत्नीच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग ॲप चोरून डाऊनलोड केले, मग जे झाले, ते त्याच्या आयुष्यातील एखादा तुफानापेक्षा कमी नव्हते. त्याने बायकोचे रण चंडिकेचे घनघोर रूप पहिल्यांदाच पाहिले.
पतीचा संशय बळावला
मंधाना पोलीस ठाण्यातंर्गत येत असलेल्या बिठूरमधील या जोडप्याचा संसार अगदी सुखात चालला होता. हा तरुण एका कारखान्यात काम करत होता. किरायाच्या खोलीत त्यांचे सुखाने दिवस जात होते. पण त्याला एक दिवस कोणीतरी सांगितले की तो कारखान्यात गेल्यावर त्याची बायको सतत कुणाशी तर तासनतास बोलते. मग पतीच्या डोक्यात संशयाचे भूत बळावले.
त्याने पत्नीच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग ॲप चोरून डाऊनलोड केले. आता पत्नी दिवसभर कुणाशी बोलते आणि काय बोलते हे आपल्याला लागलीच समजेल असे त्याला वाटले. तो कारखान्यात पोहचला. कामावरून परत आल्यावर त्याने अगोदर पत्नीचा मोबाईल हाती घेतला आणि तो घराच्या गच्चीवर पोहचला. त्याने सर्व रेकॉर्डिंग ऐकत असतानाच पत्नी गच्चीवर पोहचली. पतीची ही कृती तिला काही आवडली नाही. तिच्या हातात बेलनं होतं. त्यानेच तिने पतीला धु धु धुतले. तिच्या तावडीतून त्याने कशीबशी सुटका करून घेतली नी धूम ठोकली.
थेट गाठले पोलीस ठाणे
पती पळाला, त्याच्या मागे पत्नी सुद्धा पळाली. आता आपली काही खैर नाही असे वाटून पतीने थेट पोलीस ठाणे गाठले. पत्नी पण तिथे पोहचली. पतीने पोलिसांना सर्व आपबित्ती सांगितली. आता पोलिसांना पण काय कारवाई करावी हे काही सुचेना. त्यांनी त्यावर तोडगा काढण्यासाठी दोघांना एकमेकांसमोर बसवले. पतीची बाजू पत्नीने ऐकली. पत्नीची बाजू पतीने ऐकली. दोघांमधील समज-गैरसमज दूर करण्यात पोलिसांना यश आले. पतीने मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले रेकॉर्डिंग ॲप डिलिट केले.
पती मसाल्या कंपनीत काम करत होता. तर पत्नी मेडिकल कॉलेजमध्ये कर्मचारी आहे. कार्यालयीन प्रमुख, सह कर्मचाऱ्यांचे फोन येत असल्याने ती त्यांच्याशी सतत बोलत असल्याचे समोर आले. या दोघांना एक अपत्य पण आहे. त्यानंतर पत्नीने सुद्धा कमी बोलण्याचे मान्य केले. तर पतीने चूक मान्य केली. त्यानंतर दोघे हसत खेळत घरी गेले.