मुंबई: देशातील सर्वात प्रीमियम ट्रेन मानल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होतोय. ट्विटरवर अनेक युजर्स एक व्हिडिओ शेअर करत आहेत की ट्रेनची गुणवत्ता इतकी खराब आहे की ती पावसालाही सहन करू शकली नाही आणि यात रेल्वेचं छत गळताना दिसून येतंय. 8 सेकंदाच्या या क्लिपमध्ये ट्रेनच्या एका डब्यात पाणी पडताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
व्हायरल क्लिपमध्ये ट्रेनच्या एका डब्याच्या छतावरून पावसाचे पाणी गळताना दिसत आहे. याचवेळी यात रेल्वेची कर्मचारी साफसफाई करताना दिसतायत. डब्यात पाणी पसरू नये म्हणून कर्मचाऱ्यांनी खाली प्लास्टिकचे काही डबेही ठेवले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत एका युजरने लिहिलं आहे की, जर खरंच असं असेल तर मला कमी आरामदायी आणि जुन्या पद्धतीच्या ट्रेनमधून प्रवास करायला आवडेल.
आता या व्हिडिओच्या माध्यमातून काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष ट्विटरवर ही क्लिप जोरदार शेअर करत आहेत. केरळ काँग्रेसने हा व्हिडिओ शेअर करत हा व्हिडिओ वंदे भारत एक्स्प्रेसचा असल्याचा दावा केला आहे.
Farewell blankets, hello umbrellas: Vande Bharat redefines comfort. pic.twitter.com/8mTKeaqkYL
— Congress Kerala (@INCKerala) June 14, 2023
देशात सध्या 17 वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. 2019 मध्ये वाराणसीहून पहिली हायस्पीड ट्रेन धावली होती. यावर्षी ऑगस्टपर्यंत 75 वंदे भारत चालवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक राज्य आणि शहर रेल्वेच्या माध्यमातून जोडण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.