Mumbai Local : लेडीज डब्यातील ही धावपळ तुम्ही पाहिलीय?, सीटसाठी महिलांची कशी होते धडपड?; हा व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

| Updated on: Sep 20, 2023 | 8:24 AM

मुंबईच्या लोकलमध्ये सकाळी आणि संध्याकाळी नेहमीच प्रचंड गर्दी असते. कामावर जाण्याची आणि कामावरून परतण्याची वेळ असल्याने लोकलला प्रचंड गर्दी होते. पुरुषांचा डबा असो की महिलांचा डबा असो गर्दी ही ठरलेलीच असते.

Mumbai Local : लेडीज डब्यातील ही धावपळ तुम्ही पाहिलीय?, सीटसाठी महिलांची कशी होते धडपड?; हा व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल
mumbai local
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 20 सप्टेंबर 2023 : मुंबईकरांचं जीवन हे धावपळीचं असतं. मुंबई हे सतत सुपरफास्ट धावत असते. त्यामुळे इथले मुंबईकरही प्रचंड वेगाने धावत असतात. मुंबईकर नेहमी घाईत असतो. प्रत्येक काम हातावेगळं पटकन कसं करता येईल यावर भर असतो. शांतपणे, निवांतपणे काम करणं मुंबईकरांच्या रक्तात नाही. मग ऑफिसचं काम असो, घरचं काम असो की प्रवास… मुंबईकर सतत घाईत आणि गडबडीतच असतो. त्यातही लोकलचा प्रवास असेल तर बघायलाच नको. गर्दीच्यावेळी मुंबईकरांची झुंबड स्टेशनवर उडालेली असते आणि गाडी येताच ज्या पद्धतीने लोक गाडीत जाण्याचा प्रयत्न करतात ते पाहून नवख्या माणसाच्या काळजात धस्स होईल. बरं पुरुषांच्याच नव्हे तर स्त्रियांच्या डब्यातही हेच चित्र असतं. लेडीज डब्यातील या धावपळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तो पाहिल्यावर तुम्हीही अचंबित व्हाल.

मुंबईकर जेव्हा कधीही ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला सीट मिळावी हाच त्याचा प्रयत्न असतो. त्यातही खिडकीजवळची सीट मिळवण्यासाठी त्याची धावपळ सुरू असते. त्यासाठी एकमेकांवर कुरघोडी केली जाते. जोर जबरदस्ती केली जाते. लांबचा प्रवास असेल तर सीट मिळवण्यासाठी जीवाची पराकष्ठा केली जाते. त्यामुळे सीट पकडण्याच्या नादात कधी कधी तू तू मै मै होते. तर कधी कॉलर पकडण्यापर्यंत प्रवाशांची मजल जाते. एकमेकांना शिवीगाळ करणं, दम देणं, पुढच्या स्टेशनवर भेट तुला दाखवतोच, आजच प्रवास करतोय काय? मुंबईत नवीन आलाय का? अशी शेरेबाजी तर मुंबईच्या लोकलमधील नित्याचीच असते.

महिलांच्या डब्यातही हाणामारी

थोडक्यात काय तर मुंबईच्या लोकलमधून प्रवास करणं म्हणजे जीवमुठीत घेऊन चालण्यासारखं आहे. ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते की पाय ठेवायलाही जागा नसते. अशावेळी अनेक लोक तर ट्रेनच्या दरवाज्यात उभं राहून प्रवास करतात. बरं हा प्रकार काही पुरुषांच्या डब्यातच घडत नाही असं नाही. महिलांच्या डब्यातही हाच प्रकार घडतो. लेडीज डब्यातही जागेवरून वाद होतात. हाणामारीवर प्रकरण येतं. एकमेकांच्या झिंज्या ओढल्या जातात. महिलांनाही लोकलमध्ये सीट पकडण्यासाठी मोठ्या अग्निदिव्यातून जावं लागतं. धडपड करावी लागते. एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यात महिलांना कशा प्रकारे सीट पकडताना धावपळ करावी लागते ते यातून दिसून येत आहे.

लोकल पकडण्याची धडपड

हा व्हायरल व्हिडीओ एक लेडीज डब्यातील आहे. या व्हिडीओत महिला स्टेशनवर उभ्या आहेत. ट्रेन पकडण्यासाठी या महिला सज्ज झाल्या आहेत. ट्रेन येताच ट्रेममध्ये शिरण्यासाठी त्यांची एकच धावपळ उडताना दिसत आहे. लोकल येताच महिला डब्यात चढतात. चढताना त्या धडपडतानाही दिसत आहेत. प्रत्येकीला सीट पकडण्याची घाई दिसते. डब्यात शिरताच पहिलं लक्ष विंडो सीटकडे असतं. विंडो सीट नसेल तर दुसऱ्या नंबरच्या सीटवर जाऊन बसताना दिसतात. काही महिला तर त्यांच्या ग्रुपच्या डब्यात जाताना दिसत आहेत. आपल्या इतर मैत्रीणींसोबत गप्पा मारत मारत जाण्यासाठी त्यांची ही धडपड असते.

 

धोकादायकही

तुम्ही हा व्हिडीओ अत्यंत बारकाईने पाहिला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. स्टेशनवर लोकल पूर्णपणे थांबलीही नाही तोच महिला लोकलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. केवळ सीट मिळावी म्हणून चालत्या ट्रेनमध्ये महिला शिरताना दिसत असून हे अत्यंत धोकादायक आहे. लांबचा प्रवास असतो. तास दीड तास लागतात. अशावेळी उभं राहून प्रवास करणं शक्य नसतं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जागा पकडण्याची या महिलांची धावपळ असते. एका ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवरही हा व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.