पाटणा: लग्न! (Marriage) लिहीणाऱ्याने लिहीतच जावं, ऐकणाऱ्याने ऐकतंच जावं अशी गोष्ट. मोठमोठया लोकांनी आपले वेगवेगळे विचार लग्नाबद्दल मांडलेले आहेत. पूर्वीपासून ही संकल्पना जशा पिढ्या बदलतील तशी बदलत गेली. संकल्पना म्हणण्यापेक्षा ती अंमलात आणण्याची पद्धत हळू हळू बदलत गेली असं म्हणायला हरकत नाही. लोकं आधी ओळखीत, नातेवाईकांत लग्न करायचे आता ते हळू हळू डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर शिफ्ट होत होत अगदी ऑनलाइन लग्नापर्यंत (Online Marriage) आलेत. कधी कधी तर नवरा एकीकडे नवरी एकीकडे असं ऑनलाइन लग्न केलं जातं. हे तर सगळं आपण कायम पाहत आलोय पण नवरदेवांचा बाजार असल्याचं कधी ऐकलंय का? होय बिहारमध्ये असा बाजार (Marriage Market) भरतो ज्यात उमेदवाराच्या पात्रतेनुसार सौदा ठरतो. हा नवरदेवांचा बाजार दरवर्षी भरवला जातो. या बाजारात चक्क नेपाळहून सुद्धा उमेदवार येतात आणि बाजारात हजेरी लावतात.
नवरदेवांचा प्रसिद्ध बाजार! हा बाजार परंतु बिहारच्या मिथिलांचल भागातील मधुबनी जिल्ह्यातील सौराठ सभागाछी या नावाने प्रसिद्ध असलेल्या परिसरात भरतो. मंडळी हा आठवडी बाजार नाही नावरदेवांचा बाजार आहे बरं! या बाजाराला दूर दूर वरून अगदी नेपाळवरूनसुद्धा शेकडोंनी वधूवर हजेरी लावतात. विशेष म्हणजे इथे येणारे नवरदेव पारंपरिक धोती-कुर्ता आणि पगड़ी परिधान करुन येतात.
वधू पक्षाकडचे लोक नवरदेव पसंत करतात. सगळं मनासारखं असलं तर पुढचं बोलणं होतं. सोयरसंबंध निश्चित झाल्यानंतर निबंधक (नोंदणीकार) सहमती दस्तावेज लिहून घेतात. नोंदणीकार यासाठी कोणताही मोबदला घेत नाहीत. हा मोबदला वर-वधूपक्षाकडील मंडळीच्या स्वेच्छेवर असतो, त्यांना वाट्टेल तितका मोबदला ते देऊ शकतात. त्यानंतर ठरते लग्नाची तारीख.
इथे बाजारात येणाऱ्या लोकांची राहण्याची व्यवस्था धर्मशाळेत असते. अनेक लोक हॉटेलात, काही नातेवाईकांकडे राहतात मैथिल ब्राह्मण समुदायाशी संबंधित लोकांची गर्दी असते. वर-वधुचे कूळ, गोत्र, कुंडली आणि राशीही पाहिली जाते. कोरोनाकाळात ही परंपरा बंद होती; परंतु, मागच्या वर्षी 10 हजार लोक आले होते आणि 450 वैवाहिक संबंध जुळले होते. हा बाजार आजच्या काळातही अत्यंत लोकप्रिय आहे.